पावसाने सध्या विश्रांती घेतली असली तरी रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे पादचाऱ्यांसह वाहनधारकांची मात्र चांगलीच त्रेधा उडत आहे. परंतु खड्डय़ांवर मुरूम टाकून डागडुजी करण्यास यंत्रणेला वेळ नसल्याचे चित्र आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पावसामुळे खड्डेमय झालेल्या सातारा परिसरातील रस्त्यांवर मनसेच्या वतीने मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचे अभिनव आंदोलन करण्यात आले.
या भागातील नागरिकांनी याप्रश्नी संबंधित ग्रामपंचायत, बांधकाम विभाग व स्थानिक नेत्यांना निवेदन देऊन लक्ष वेधले, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. मनसेचे सतनामसिंग गुलाटी व राजकुमार दिवेकर यांचेही लक्ष वेधले. त्यानंतर मनसेच्या वतीने रेणुकामाता मंदिर कमानीपासून दीड ते दोन किलोमीटर रस्त्यावर ‘खड्डे बुजवा अभियान’ सुरू करण्यात आले. यासाठी राज कन्स्ट्रक्शनचे १० टिप्पर, १ जेसीबी, १ रोडरोलर, १ ट्रॅक्टर आदींचा वापर करून हे काम करण्यात आले. जनतेने याबद्दल समाधान व्यक्त केले.