तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) प्रकल्पातंर्गत नाळीद येथील ५० आदिवासींना कुक्कुटपालन सामग्रीचे वाटप करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी जितेंद्र शहा यांनी दिली.
आत्मा प्रकल्पांतर्गत या शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरिता व जोडधंदा म्हणून प्रतिलाभार्थी १८० गावठी कोंबडीची पिले, १० किलो खाद्य, रोगप्रतिबंधक लस असे साहित्य त्यात समाविष्ट आहे. याआधी आत्माअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी गावातील ५० आदिवासींची रब्बी हंगामासाठी निवड करून त्यांना निफाडमधील गहू संशोधन केंद्रातून त्र्यंबक ३०१ या वाणाच्या बियाण्याचा पुरवठा करण्यात आला होता. शेतीपूरक जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय, विविध गावठी कोंबडीच्या जाती, कमी जागेवर शेड उभारणीचे नियोजन, सुधारित पोषक खाद्य, मर रोग प्रतिबंधक लस, विक्रीचे नियोजन, याबाबत कृषी पर्यवेक्षक किशोर भरते, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक चेतन शिंदे यांनी मार्गदर्शन केले.