वाडीवऱ्हे उपकेंद्रात केबल जळाल्यामुळे गोंदे औद्योगिक वसाहत व परिसरातील खंडित झालेला वीज पुरवठा तब्बल १५ तासानंतर मध्यरात्री सुरळीत झाला. तांत्रिक दोषाचा फटका गोंदे वसाहतीसह वाडिवऱ्हे, नांदुरवैद्य, नांदगाव, गोंदेगाव व सांजेगावसह आसपासच्या परिसरास सहन करावा लागला.
वाडिवऱ्हे उपकेंद्रात बॅटरी चार्जरची केबल जळाल्याने आठ वाहिन्यांवरील वीज पुरवठा खंडित झाला होता. या घटनेची माहिती समजल्यानंतर महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी लगेचच प्रयत्न सुरू केले.
प्रारंभी ३३ केव्हीए क्षमतेच्या वाहिनीवरील दोष दूर करण्यात आला. त्यानंतर ११ केव्हीए वाहिन्यांवरील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. रात्री उशिरा हा दोष दूर झाल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली. या उपकेंद्रामार्फत गोंदे औद्योगिक वसाहत, वाडिवऱ्हे, नांदुरवैद्य, नांदगाव, गोंदेगाव, साजेंगाव आदी गावांना वीज पुरवठा केला जातो. या सर्व परिसरातील वीज सकाळपासून खंडित झाली होती.
१५ तासाहून अधिक काळानंतर महावितरणला हा दोष दूर करणे शक्य झाले. काही वाहिन्यांवरील दोषाचे त्वरित निराकरण झाले. परंतु, ११ केव्हीए क्षमतेच्या भूमिगत तारांमधील दोष दूर करण्यास कालापव्यय झाला. ही किचकट प्रक्रिया असल्याने त्यास विलंब झाल्याचे महावितरणने म्हटले आहे. कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकाळपासून ठाण मांडून वाहिन्यांवरील दोष दूर करण्यासाठी प्रयत्न केले. गोंदे औद्योगिक वसाहतीत काही बडे उद्योग कार्यरत आहे. वीज गायब झाल्याचा आर्थिक फटका त्यांना सहन करावा लागला.