News Flash

यंत्रमाग कामगारांची पंधराशे रुपयांच्या वेतनवाढीची मागणी

सद्य:स्थितीत यंत्रमाग कामगारांना १५०० रुपयांची मजुरीवाढ आणि आवाडे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी उद्या सोमवारी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थित होणाऱ्या बैठकीवेळी केली जाणार

| February 3, 2013 08:49 am

सद्य:स्थितीत यंत्रमाग कामगारांना १५०० रुपयांची मजुरीवाढ आणि आवाडे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी उद्या सोमवारी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थित होणाऱ्या बैठकीवेळी केली जाणार आहे. आवाडे समितीच्या शिफारशींची यंत्रमागधारक व कामगार या दोन्ही घटकांनी स्वागत केले असले, तरी ते राबविण्यासाठी कामगारमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनापुढे तातडीने प्रयत्न करण्याचे गरजेचे आहे, असे माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांनी रविवारी पत्रकारपरिषदेत बोलताना व्यक्त केले.
यंत्रमाग कामगारांच्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करताना आवाडे म्हणाले,महागाईची स्थिती पाहता कामगारांना मजुरीवाढ मिळणे गरजेचे आहे. यंत्रमाग व्यवसायातील मंदीची स्थिती पाहता दरमहा १५०० रुपये मजुरीवाढ होणे गरजेचे आहे. कामगार नेत्यांनी आंदोलन किती ताणायचे याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. दिवंगत कामगार नेते कॉ.के.एल.मलाबादे यांनी कामगारांच्या मजुरीवाढीसाठी मोठमोठी आंदोलने केली. मात्र कोणत्या वेळी व कोणत्या टप्प्यावर थांबायचे याची नेमकी जाण त्यांना होती. आता तेराचौदा संघटना एकत्र येऊन लढा देत असले, तरी त्यातील एकाही नेत्याकडे मलाबादे यांच्याकडे असलेली प्रगल्भता दिसत नाही. परिस्थितीचा विचार करून कोठे थांबायचे याचा विचार कामगारनेत्यांनी करणे गरजेचे आहे. दरमहा १५०० रुपयांची वाढ कामगारांच्या मजुरीमध्ये झाली पाहिजे. म्हणजे आताच्या मजुरीत मीटर मागे १७ ते १८ पैसे मजुरी वाढणार आहे. या पटीत बोनसची रक्कमही वाढणारी आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात बोनसची रक्कम देणे यंत्रमागधारकांना शक्य नाही. हे आर्थिक गणितही कामगार नेत्यांना उमगले पाहिजे. इचलकरंजीची वाढती औद्योगिक परिस्थिती, येथे येत असलेल्या नवनव्या विकासयोजना याकडे लक्ष ठेवून येथील औद्योगिक शांतता टिकण्याची गरज आहे. दुर्दैवाने गेल्या दोनचार वर्षांत सतत काहीना काही आंदोलने होत राहिल्याने या शांततेला तडा जाताना दिसत आहे.
यंत्रमाग कामगारांच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाने समिती नेमली होती. आवाडे समिती नावाने ही ओळखली जात आहे. यंत्रमाग कामगारांच्या वेतनाचा प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय म्हणून समितीतील शिफारशींची अंमलबजावणी झाली पाहिजे, असा उल्लेख करून आवाडे म्हणाले, कामगारमंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत सोमवारी होणाऱ्या सर्वसमावेशक बैठकीत ही मागणी केली जाणार आहे. यंत्रमागधारक व कामगार या दोन्ही घटकांना मान्य होतील व राबविल्या जातील अशा स्वरूपाच्या या शिफारशी आहेत. त्यासाठी राज्य शासनाकडून आर्थिक तरतूद होणे गरजेचे आहे. त्यासाठी कामगारमंत्री मुश्रीफ यांनी सध्या अंदाजपत्रकाची प्राथमिक प्रक्रिया सुरू झाली असताना त्यामध्ये या विषयासाठी तरतूद करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हा विषय सध्या कामगार मंत्रालयाच्या कक्षेत असून त्याकडे त्यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष दिले पाहिजे. या समितीच्या शिफारशीमध्ये कामगारांना योग्य वेतन, घरकुल, आरोग्य विषयक सुविधा या संदर्भातील तरतुदी केल्या आहेत, असेही आवाडे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2013 8:49 am

Web Title: power loom workers demand for 1500 rs increment
Next Stories
1 राष्ट्रवादीला राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्याचे आगामी निवडणुकांत उद्दिष्ट- अजित पवार
2 दुचाकी गॅरेज व मेकॅनिक महासंघ प्रदेशाध्यक्षपदी सोलापूरचे राजेंद्र घुले
3 शेतकऱ्यांना पेन्शन मिळण्यासाठी जनता दलाचे राज्यव्यापी आंदोलन
Just Now!
X