संपूर्ण जगभर ऊर्जा उत्पादनाचे मोठे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येकजण ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचे प्रयत्न करत असताना महाराष्ट्रात मात्र गेल्या दोन वर्षांपासून आगामी तीन वर्षांत ऊर्जेच्या बाबतीत राज्य स्वयंपूर्ण होईल अशी घोषणा केली जाते. ‘तीन वजा दोन बरोबर तीन’ असेच राज्याचे ऊर्जेबाबतीतील धोरण असल्याची  टीका ‘लोकसत्ता’ चे संपादक गिरीश कुबेर यांनी केली.
लातूर फेस्टिव्हल अंतर्गत ‘शब्दोत्सव’ कार्यक्रमात रविवारी ‘वेगळे रस्ते-आगळी पुस्तके’ या सत्रात ‘माझी तेलसत्तेवरील पुस्तके’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर निळू दामले, दीपक घारे, प्राचार्य संदीपान जाधव व नीलिमा बोरवणकर उपस्थित होते.
कुबेर म्हणाले, भारतात ८० टक्के तेल आयात केले जाते. स्वातंत्र्यानंतर आमच्याकडे ऊर्जेच्या विषयात गांभीर्याने लक्षच दिले गेले नाही. मिळेल त्या मार्गाने ऊर्जा उत्पादन केले पाहिजे. मात्र, या बाबतीत सरकार उदासीन राहिले. राज्यात भारनियमनाला सामोरे जावे लागते आहे. तीन वर्षांत महाराष्ट्र भारनियमनमुक्त होईल, असे आश्वासन गेल्या दोन वर्षांपासून सरकार देते आहे. दोन वष्रे संपल्यानंतर एकच वर्ष शिल्लक राहते, हे लोकांना कळत नाही असे समजून मंत्री बोलत असतात. ऊर्जेच्या बाबतीत आम्ही ऊर्जाधळे झालो आहोत. जगभर २०५० पर्यंत ऊर्जाधोरण आखले जाते. सरकार बदलले तरी देशाचे धोरण बदलत नाही. अमेरिका २०१७ मध्ये ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होते आहे. तेल उत्पादनात सौदी अरेबियानंतर अमेरिकेचा दुसरा क्रमांक आहे. अमेरिका तेल उत्पादनात स्वयंपूर्ण झाल्यास जगात नवे प्रश्न निर्माण होतील, असे ते म्हणाले.
ऊर्जा उत्पादनासाठी जैतापूरसारखे मोठे अणुप्रकल्प उभे न करता एक-दोन मेगावॅटचे छोटे प्रकल्प ठिकठिकाणी उभे करण्याचे धोरण आखले पाहिजे, असे ते म्हणाले. इंधनाच्या बाबतीत शासनाकडून मोठय़ा प्रमाणावर अनुदान मिळत असल्यामुळे इंधनाचा गरवापर होतो आहे. ऊर्जाविषयक जाणीव निर्माण केली पाहिजे. ऊर्जेची मिजास न परवडणारी असल्याचे ते म्हणाले. ब्राझीलमध्ये दोन वर्षांपूर्वी शंभर टक्के इथेनॉलवर चालणारी कार वापरली जाते. महाराष्ट्रात १६० साखर कारखाने आहेत. त्यांनी तयार केलेले इथेनॉल राज्यात नेमके कोणत्या ऊर्जेसाठी वापरले जाते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तेलासारख्या अस्पíशत विषयाकडे आपण नेमके कसे वळलो? ज्यातून तेलाच्या विविध अंगांचा अभ्यास करून अनेक पुस्तके लिहिली गेली, ती गाजली याचा तपशीलही त्यांनी श्रोत्यांसमोर उलगडला.
मुक्त पत्रकार निळू दामले यांनी ‘आगीत उतरताना’ या विषयावर दंगली, दहशतवाद, बॉम्बस्फोट, अतिरेकी हल्ले अशा विषयांचा प्रत्यक्ष तेथे जाऊन, संबंधितांना भेटून त्यांना प्रश्न विचारून, मुलाखती घेऊन त्यावरील पुस्तके कशी लिहिली? याबद्दलची माहिती दिली. ओसामा बिन लादेन याच्या सहकाऱ्यांना कसे भेटलो? त्यांनी तुझा खून करेन असे तोंडावर सांगितल्यावरही त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांना त्या हेतूपासून कसे परावृत्त केले, हे सांगून त्यांनी धर्म, िहसा, दहशतवाद हे प्रश्न गंभीर असले तरी त्यातही माणुसपणाचे कंगोरे कसे दडले आहेत, याच्या आठवणी सांगितल्या.
प्रा. दीपक घारे यांनी ‘चित्रकलेवरील पुस्तके’ या विषयावर, महाराष्ट्रातील कलेचा गेल्या दोनशे वर्षांचा इतिहास मोजक्या शब्दात श्रोत्यांसमोर मांडला. आधुनिक चित्रकला व यथार्थवादी चित्रकला यात विरोधाभास असल्याचे मत अनेकजण मांडतात. वस्तुस्थिती मात्र तशी नसून ते एकमेकांना पूरक असल्याचे घारे म्हणाले. शनिवारवाडय़ातील कला शाळेत गंगाराम तांबट यांची चित्रकला ते आजच्या संगणक युगात चित्रे काढणाऱ्या सध्याच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची चित्रकला यात एक सुप्त धागा असल्याचे ते म्हणाले. चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला, कविता, व्यंग, अ‍ॅनिमेशन अशा कला माध्यमाच्या स्फोटात संगती लावणे अवघड आहे. त्यातून जीवनाचा नवा अन्वयार्थ समजून घेतला पाहिजे. दृश्यकलेतील व्यापकपणा जाणून घेऊन अभिरुची वृद्धिंगत करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप नणंदकर यांनी केले. आभार रमेश चिल्ले यांनी मानले तर प्राचार्य संदीपान जाधव यांनी सत्राचा समारोप केला.