वीज दरवाढीच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हय़ातील यंत्रमाग उद्योग आजपासून पाच दिवस बंद राहणार आहेत. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी यंत्रमागधारकांच्या विविध संघटनांनी व लोकप्रतिनिधींनी धरणे आंदोलनात सहभाग नोंदविला. शासनाच्या वीज दरवाढीच्या चुकीच्या धोरणावर जोरदार टीका करीत दरवाढमागे घेतली जात नाही तोपर्यंत आंदोलन प्रखरपणे लढविण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.    
यंत्रमाग उद्योगास वीज दरवाढीचा जबर फटका बसला आहे. या दरवाढीच्या विरोधात गेल्या महिन्यापासून मोर्चा, वीजबिल होळी अशाप्रकारची आंदोलने करण्यात आली. या अंतर्गत आता कोल्हापूर व सांगली जिल्हय़ातील यंत्रमाग उद्योग पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे इचलकरंजी, वडगाव, कुरुंदवाड, रेंदाळ या कोल्हापूर जिल्हय़ातील तसेच विटा व माधवनगर या सांगली जिल्हय़ातील यंत्रमाग आज बंद राहिले.
इचलकरंजीतील प्रांताधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले. खासदार राजू शेट्टी, आमदार सुरेश हाळवणकर, माजी खासदार निवेदिता माने, वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, मेट्रो हायटेक पार्कचे अध्यक्ष सुरेश पाटील, पिडिक्सेलचे अध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल, दीपक राशीनकर, विनय महाजन, विश्वनाथ मेटे, सचिन हुक्किरे, डी. एम. बिराजदार, गणेश भांबे, कामगार नेते श्यामराव कुलकर्णी आदींनी आपल्या भाषणात शासनाच्या चुकीच्या वीज दरवाढीच्या धोरणावर टीकेची झोड उठविली.