भाऊसाहेब शेवाळकर संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य आणि डॉ. वसंतराव देशपांडे यांचे शिष्य पं. महामहोपाध्याय प्रभाकर देशकर यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पुतणे आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. अंबाझरी घाटावर शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देशकर यांच्या निधनाची बातमी कळताच संगीत आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या रामदासपेठमधील निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले.
नागपूर विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी अखिल भारतीय गांधर्व संगीत विद्यालयाची संगीत अलंकार पदवी मिळविली. प्रभाकर देशकर यांनी प्रारंभी पं. शंकरराव सप्रे, त्यानंतर गायनाचार्य पं. शंकरराव प्रवर्तक आणि त्यानंतर डॉ. वसंतराव देशपांडे यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले होते. शास्त्रीय संगीताचा अभ्यास करून त्याची दीर्घकाळ उपासना करणारे फार कमी असतात. मात्र, पं. प्रभाकर देशकर यांनी संपूर्ण आयुष्य संगीत सेवेसाठी घालविले. पूर्वीच्या बुटी संगीत व सध्याचे भाऊसाहेब शेवाळकर संगीत महाविद्यालयात १९६९ पासून ते प्राचार्य होते आणि त्यांनी शेवटपर्यंत संगीताची सेवा केली. ते नागपूर दूरदर्शन आणि आकाशवाणीचे अ श्रेणी कलाकार होते. संगीत पारितोषिक, गड आला पण सिंह गेला, संगीत वहिनी, पंख हवे मज, पंख लाभले आज स्वरांना, संगीत मखमली हे स्वप्न माझे, अस्मिता, शिवाई, कटय़ार काळजात घुसली, असं झालच कसं इत्यादी नाटकात त्यांनी भूमिका केल्या. कटय़ार काळजात घुसली या नाटकातील त्यांची खॉं साहेबांची भूमिका गाजली. राज्यात शासनातर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला होता. देशकर यांना राज्य शासनाचा उत्कृष्ट कंठ पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचा ज्येष्ठ गायक, ऑस्ट्रेलियातील विंडसर कार्पोरेशनच्या महापौरांतर्फे सिडनेला प्रशस्तीपत्र देऊन सन्मान, अखिल भारतीय गांधर्व संगीत महाविद्यालयातर्फे २००५ मध्ये बेळगावमध्ये संगीत महामहोपाध्याय उपाधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे जीवन साधना उपाधी सन्मान, मध्यप्रदेश सरकारतर्फे बैजुबावरा संगीत सन्मान, नागपूर महापालिकेतर्फे ज्येष्ठ शास्त्रीय गायक म्हणून सन्मान आदी पुरस्कार त्यांना मिळाले. डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिनिमित्त नुकताच त्यांनी कार्यक्रम सादर केला होता आणि तो त्यांचा शेवटचा कार्यक्रम ठरला. पं. प्रभाकरराव देशकर संस्कार भारती अखिल भारतीय संगीत विभाग प्रमुख त्यांनी काम बघितले. अंबाझरी घाटावर झालेल्या शोकसभेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी महापौर अनिल सोले, मदन गडकरी, रमेश अंभईकर, जगदीश टेकाडे, बंडोपंत रोडे, भैयाजी सामक, चंदू घरोटे, बाळासाहेब पुरोहित, विलास मानेकर, आशुतोष शेवाळकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.