नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला रामराम ठोकण्याच्या निश्चयावर ठाम राहिल्याने के. एल. प्रसाद यांच्या जागी नवीन आयुक्त नेमण्याच्या हालचालींनी वेग घेतला असून शहरात महिलाराज आणण्याऐवजी नवी मुंबईसाठी वेगळी ‘प्रभात’ दाखविण्याचे सरकारने ठरविले आहे. त्यामुळे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रभात रंजन यांच्या नावावर नवी मुंबई आयुक्त म्हणून शिक्कामोर्तब झाले असून ते मंगळवारी पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. छोटे पोलीस आयुक्तालय म्हणून थेट आयपीएस अधिकारी या आयुक्तालयाला नाके मुरडत असल्याने या आयुक्तालयाचा कार्यविस्तार खोपोलीपर्यंत नेण्याचे मोठे आव्हान नवीन आयुक्तांसमोर उभे ठाकणार आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयाचा एक भाग असलेले नवी मुंबई पोलीस आयुक्तालय २० वर्षांपूर्वी अस्तित्वात आले असून सध्या २० पोलीस ठाणी या आयुक्तालयाच्या अखत्यारीत येत आहेत. मुंबई, ठाणे, नागपूर, पुण्यासारख्या आयुक्तालयातील एखाद्या उपायुक्ताच्या आधिपत्याखाली इतकी पोलीस ठाणी असल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्त हे थेट आयपीएस अधिकाऱ्यांना अपमानास्पद वाटत असल्याचे दिसून येते. काहीजण हे पद स्वत:चे अवमूल्यन समजत असल्याने काही उच्च अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन या पदाचा दर्जा वाढविण्यात आला आहे, पण त्यामुळे केवळ पदोन्नतीचे सुख लाभलेल्या अधिकाऱ्यांना कामाचा विस्तार नसल्याचे दिसून येते. त्यामुळे थेट आयपीएस असलेले जावेद अहमद, ए. एन, रॉय, के. एल. प्रसाद या अधिकाऱ्यांचा एक पाय नवी मुंबईत आणि एक पाय मुंबईत असल्याचे चित्र होते. प्रसाद हे शेवटपर्यंत नवी मुंबईत म्हणावे तसे रमले नाहीत, त्यामुळे ते सिडकोच्या विश्रामगृहावर राहून बदलीची वाट पाहत होते. त्यांना ठाणे किंवा पुण्याचा आयुक्त म्हणून न्याय युती शासनाच्या काळात तरी मिळेल अशी अपेक्षा होती, पण ती फोल ठरल्याने त्यांनी राजीनाम्याचे हत्यार उपसले. थोडे दिवस नवी मुंबईत काढण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतरही त्यांनी त्याला नकार देऊन ते राजीनाम्यावर ठाम राहिले. त्यामुळे त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची चर्चा सुरू झाली होती. यात अतिरिक्त महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या नावाची चर्चा होती. त्यात प्रभात रंजन यांनी बाजी मारली असून त्यांची नियुक्ती ही वरिष्ठ श्रेणीनुसार झाली आहे. ते १९८४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ऑगस्ट २०१७ रोजी ते निवृत्त होत आहेत. नवी मुंबईचा विस्तार झपाटय़ाने होत असून देश आणि राज्य पातळीवरील मोठमोठे प्रकल्प शहरात येत आहेत. त्यात महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणारा विमानतळ चार वर्षांत होण्याची शक्यता असून त्यांच्या प्रत्यक्ष कामाला डिसेंबरमध्ये सुरुवात होणार आहे. त्यामुळे दिल्ली अलीबाग कॉरिडोअरपासून नयना प्रकल्पाची नीव येत्या काळात रायगड जिल्ह्य़ात टाकली जाणार असल्याने येथील पोलिसांची जबाबदारी वाढणार आहे. विस्ताराने छोटे असलेल्या या पोलीस आयुक्तालयाचा विस्तार करण्याचे मोठे काम नवीन आयुक्तांसमोर आहे. त्यामुळे नयना क्षेत्राची २७२ गावे या आयुक्तालयाच्या कक्षेत घ्यावी लागणार आहेत. आयुक्तालयाची हद्द खोपोलीपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे या अगोदर पाठविण्यात आला आहे. तो मंजूर करून घेण्याचे कार्य नवी आयुक्तांच्या यादीतील पहिले काम ठरणार आहे. याशिवाय चार नवीन पोलीस ठाण्यांची मंजुरी, पोलीस कर्मचारी, पोलीस ठाण्यांचा मेकओव्हर, पोलिसांसाठी क्वार्टर्स या अंतर्गत सुधारणांबरोबरच चेनस्नॅचिंग, घरफोडी, वाहनचोरी यांसारख्या गुन्ह्य़ांना आळा घालण्याचे काम नवीन आयुक्त करतील अशी नवी मुंबईकरांची अपेक्षा आहे.