कलावंत त्याच्या कलेला मिळणाऱ्या दामदुप्पट किमतीसाठी काम करत नाही, खरा कलावंत काम करतो त्याच्या कलेला खऱ्या रसिकांकडून मिळणाऱ्या पावतीसाठी! बांधकाम व्यावसायिक असणाऱ्या अशाच एका व्यक्तिमत्त्वाने त्याच्या व्यवसायातून इतरांच्या स्वप्नांना साकारले, पण त्याच बांधकाम व्यावसायिकाने शिल्पकलेच्या माध्यमातून त्याच्या स्वप्नांना वाट मोकळी करून दिली. अशावेळी दालन सजवण्यासाठी कोटय़वधी रुपये मोजून या शिल्पाकृती विकत घेणाऱ्यांपेक्षा, वर्षभर पैसे जमवून एक मध्यमवर्गीय शिक्षक जेव्हा ती कला घेऊन जातो, तेव्हा तो आनंद अवर्णनीय असतो. अशाच अवर्णनीय आनंदात नागपुरातील राजेंद्र प्रधान नावाचे हे व्यक्तिमत्त्व सध्या न्हाऊन निघाले आहे.
जगभरातील अनेक मोठय़ा शहरांमध्ये युरोपीयन आर्ट सोसायटीच्या परवानगीअंतर्गत दर दोन वर्षांनी ‘आर्ट बिनाले’ या नावाने आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शन आयोजित केले जाते. न्यूयॉर्क, बर्लिन यासारख्या विदेशातील अनेक शहरांमध्ये या कला प्रदर्शनाची सुरुवात झाली. भारतात प्रथमच कोलकाता येथे ७ ते १९ एप्रिलदरम्यान हे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात नागपूरच्या प्रधान पिता-पुत्रांचा सहभाग आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने बांधकाम व्यावसायिक राजेंद्र प्रधान व त्यांचा मुलगा चिन्मय प्रधान यांनी लोकसत्ताला दिलेल्या भेटीत त्यांच्या शिल्प आणि चित्रकृतीचा प्रवास उलगडला. साधारणपणे बारा वषार्ंपूर्वी ध्यानीमनी नसताना ते शिल्पकलेकडे झुकले. जन्मत: कर्णबधिर असणाऱ्या चिन्मयची चाहूल आणि वडिलांचा मृत्यू या दोन गोष्टी त्यासाठी कारणीभूत ठरल्या. वडिलांच्या छायाचित्राची कमतरता त्यांनी त्यांच्या कलेतून पूर्ण केली. त्यानंतर मुलीचे लग्न आणि नातवाची चाहूल यामुळे कवीमनाच्या या कलावंताची कला आणखी बहरली. देशविदेशात त्यांच्या अनेक शिल्पाकृती नावाजल्या गेल्या, नव्हे त्यांच्या कलेला मोलही मिळाले, पण कोलकात्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनात एका शिक्षकाकडून मिळालेली दाद त्यांना आजही मोलाची वाटते.
Untitled-1
कोलकाता-लंडन-अंकारा येथे कार्यरत ‘रॉयमॅन्स आर्ट स्टुडिओ’ संस्थेने कोलकाताच्या बिडला अकादमी ऑफ आर्ट अँड कल्चर सभागृहात हे प्रदर्शन आयोजित केले आहे. हॉलंडचे रहिवासी डॉ. मानस रॉय या स्टुडिओचे संचालक आहेत. ते स्वत: आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त चित्रकार तसेच शिल्पकार आहेत. युरोपीयन व भारतीय निवडकर्त्यांनी जगभरातून २०० कलाकृतींची निवड ‘आर्ट बिनाले’साठी केली. त्यात राजेंद्र प्रधान यांच्या नऊ शिल्पाकृतीचा तर चिन्मय प्रधानच्या चार चित्राकृतींचा समावेश आहे. भारतासह युरोप, मध्य-पूर्व, तुर्की, तायवान आणि अफ्रिका येथील कलाकृतींचा यात समावेश आहे. एम.एफ. हुसेन, नंदलाल बोस, जोगेन चौधरी यासारख्या दिग्गज कलावंतांच्या पंक्तीत त्यांच्या कलाकृती जाऊन बसल्याने त्याचा वेगळाच आनंद या पितापुत्रांच्या चेहऱ्यावर बघायला मिळतो.
राजेंद्र प्रधान
राजेंद्र प्रधान यांनी कधीही या कलेसाठी लागणारे प्रशिक्षण घेतले नाही. मनात जे जे येत गेले, ते ते त्यांनी कधी कवितेतून आणि ती कविता शिल्पाकृतीतून साकारली. आज घरीच त्यांनी स्टुडिओ उभारला आहे. व्यवसायासाठी कमी आणि कलेसाठी अधिक वेळ ते खर्ची घालत आहे. कधीकधी कधी अवघी रात्र त्या कलाकृतीच्या जन्मासाठी त्यांनी जागवली आहे. मन असेल तर अवघ्या आठ दिवसात नाही तर महिनाभरात त्यांची कलाकृती पूर्ण होते. त्यासोबतच त्यांनी छायाचित्रण आणि पक्षीनिरीक्षणाचा छंदही जोपासला आहे.
चिन्मय प्रधान
जन्मत: कर्णबधीर असूनसुद्धा चिन्मयने त्याला कमजोरी न बनवता सर्वसामान्य शाळातून शिक्षण पूर्ण केले. नागपूरच्या सिस्फामधून त्याने मास्टर इन फाईन आर्टचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. नागपूरशिवाय कोलकाता, दिल्ली, जयपूर, ग्वाल्हेर अशा अनेक शहरात त्याची चित्रे प्रदर्शित झाली आहे. निसर्ग आणि पर्यावरण हे आवडीचे विषय असलेल्या चिन्मयची संवेदनशीलता त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतून झळकते.
‘हे कला रसिकांचे शहर नाही’
नागपूर हे कला रसिकांचे शहर नाही, असे स्पष्ट मत या व्यावसायिक कलावंतांचे आहे. कलावंतांच्या कलेला पैशाचे मोल नको तर ती कला जाणून घेण्याचे मोल लागते. इथे कलावंतांच्या कलेला हे मोल नाही. वास्तविक स्वप्नव्रत प्रकल्प या शहरात येत असताना कलावंतांच्या कलेला उभारी देणारे कोलकात्यासारखे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आयोजित केले जाणे अपेक्षित आहे. मात्र, अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय आयोजन सोडाच, पण कलेची कदरही इथे नसल्याची खंत राजेंद्र प्रधान यांनी व्यक्त केली.