विदर्भाच्या वाटेला येणाऱ्या बसगाडय़ा इतरत्र वळवून जुन्या गाडय़ा विदर्भात देण्याचा घाट रचला जात असल्याचा आरोप करून प्रहार संघटनेने आज भंगार वस्तू एस.टी.आगारात दान करून निषेध नोंदवला, तसेच महिन्याभराच्या आत नव्या बसगाडय़ा सेवेत न दिल्यास एकही भंगार गाडीची सेवा चालू देणार नाही, असा इशाराही संघटनेने दिला.
राज्यातील इतर एस.टी.आगारात वापरून भंगार झालेल्या बसेस विदर्भाच्या एस.टी.आगाराकडे पाठविल्या जातात, असा आरोप प्रहारचे बाळा जगताप यांनी केला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कारभारातूनच ही माहिती पुढे आल्याचे ते म्हणाले. या जुन्या भंगार बसेसमुळे अपघाताचा धोका कायम ठरला आहे. ब्रेक नादुरुस्त होणे, स्टेअरिंग लॉक  होणे, तुटलेल्या खिडक्या, बेंच, आसनव्यवस्था, तसेच चालतांना होणारा कर्कश आवाज, अशी या बसेसची अवस्था आहे. अशा भंगार बसेसमुळे होणाऱ्या अपघातास चालकास जबाबदार धरले जाते. जिवित हानीही होतेच. राज्य परिवहन महामंडळाकडून अशी सापत्न वागणूक विदर्भातील परिवहन सेवेला दिली जात असल्याचा आरोप संघटनेने केला. या सापत्नभावाच्या निषेधार्थ प्रहार संघटनेने आज भंगार गाडय़ांचा प्रतिकात्मक निषेध आर्वी आगारात नोंदविला. भंगार टायर, स्टेअरिंग, सायलेंसर, खिडक्या असे साहित्य आगारात दान करण्यात आले.