कार्पोरेट सेक्टरच्या ‘प्रॉफिट मेकिंग’च्या जगात उत्पादन करताना माणसांकडे केवळ साधन म्हणुनच पाहिले जाते, त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, मनुष्य केंद्रबिंदु व्हायला हवा. यासाठी कायदा आहे, परंतु तो मोडण्याचीच प्रवृत्ती कार्पोरेट जगात अधिक आहे, यासाठी स्वयंनियंत्रण महत्वाचे, त्यासाठी बुद्धाच्या तत्वज्ञानाचा विचार कार्पोरेट सेक्टरने करावा, असे आवाहन माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
डॉ. भा. पा. हिवाळे शिक्षण संस्थेच्या इन्स्टिटय़ुट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज विभागाच्या वतीने ‘बुद्धिझम अँड कार्पोरेट कल्चर’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. तिचे  उद्घाटन आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. विजय पंढरीपांडे होते.
सध्याच्या सांस्कृतिक विसंवादामध्ये प्रत्ेक व्यक्तीत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, यासाठी अंतर्मुख होऊन स्वत:चा दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीने जाणीवपुर्वक कृती करण्यासाठी योग्य दृष्टीकोन व प्रामाणिकपणा आवश्यक आहे, परंतु त्याचीच देशात कमतरता जाणवतोहे, अशी खंत आंबेडकर यांनी व्यक्त केली.
चांगली व्यक्ती होण्यासाठी चांगली तत्वे माहित असणे व ती स्वीकारणे आवश्यक आहे, त्यासाठी केवळ पुस्तके व अभ्यासक्रमामध्ये स्वत:ला मर्यादित न ठेवता आयुष्यातील अनुभवावरुनही शिकायला हवे. कोणत्याही संस्थेसाठी केअरिंग, लिस्निंग, अकौंटिंग, शेअरिंग व सेन्सींग महत्वाचे आहे, असे डॉ. पांढरीपांडे यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठाच्या मॅनेजमेंट विभागाचे संचालक डॉ. डब्ल्यु. के. सरवदे यांनी, उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी, मालक आणि चालक यांच्यातील मतभेदांमुळे होणाऱ्या नुकसानावर मात करण्यासाठी प्रत्येक संस्थेने नम्रता, एकाग्रता, प्रज्ञाशील करुणा या बौद्धवादाच्या तत्वांचा अवलंब करण्याचे अवाहन केले. यावेळी श्रीलंकेतील तज्ज्ञ डॉ. असोका जीनदास, फिलिप बार्नबस, डॉ. एन. एम. अॅस्टन, आयएमेसचे सरसंचालक डॉ. शरद कोलते, बाळासाहेब गांधी तसेच विविध औद्योगिक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. डॉ. मिरा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे संचालक डॉ. एम. बी. मेहता यांनी आभार मानले.