कुर्ला महानंद नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकास प्रकल्पात झालेलया घोटाळ्याची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत(सीआयडी) चौकशी करण्याचे आदेश गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रकल्पाच्या कामासही स्थगिती देण्यात आली आहे.
या सोसायटीच्या पुनर्विकास प्रकल्पात रहिवाशांना अंधारात ठेवून म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी विकासकाला बेकायदेशीरपणे मदत केल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. या घोटाळ्याबाबत संस्थेच्या काही सभासदांनी गृहनिर्माण मंत्र्यांकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. त्यावर ‘हा गंभीर गुन्हा असल्याचे दिसते. त्यामुळे संपूर्ण प्रकरण दक्षता पथकाकडून तपासून घ्यावे आणि शक्य असेल तर आर्थिक गुन्हे शाखा किंवा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी करावी. तसेच तोवर ही योजना स्थगित करावी’ असे आदेश मेहता यांनी म्हाडाच्या उपाध्यक्षांना दिले आहेत. मात्र या आदेशाबाबत आपल्याला कल्पना नसून त्यांची माहिती घेऊन मंत्रीमहोदयांच्या निर्देशानुसार उचित कारवाई केली जाईल असे म्हाडाचे उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांनी सांगितले.महानंद गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासाचा वाद गेल्या दोन वर्षांपासून गाजत आहे. या प्रकल्पासाठी सोसायटीचे पदाधिकारी आणि विकासकाने तसेच म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी बनावट दस्तावेजांच्या आधारे योजनेला मंजूरी देण्यात आलयाचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. सभासदांच्या खोटय़ा सह्य़ा करून बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी सबंधितांवर कुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल असून काहींना अटकही झाली होती. तसेच म्हाडाच्या अधिकाऱ्यांनीही परिशिष्ट-२ दोनवेळा बोगस बनविल्याचे आणि जागेच्या भाडेपटय़ाबाबतची कागदपत्र (लीजची मुळ प्रत) म्हाडाच्या कार्यालयातून गायब झाल्याचे दक्षता पथकाच्या चौकशीतू आढळून आल्याची बाबही रहिवाशांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणली असून त्याच्याच आधारे चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तर मंत्र्यांच्या आदेशाची प्रत आम्ही म्हाडास दिली असून त्याचेच अधिकारी त्यात गुंतल्याने कारवाई अजून झालेली नसल्याचे रहिवाशांनी सांगितले.