गेली अनेक वर्षे पर्यटन व्यवसाय सांभाळणाऱ्या प्रमोद चितारी यांच्या ‘प्रवासी मित्र खंड-११’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांच्या हस्ते झाले.  मुंबई साहित्य संघाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध लेखिका गिरिजा कीर तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षक सुधाकर सुराडकर  उपस्थित होते.
जगद्गुरू शंकराचार्च, स्वामी विवेकानंद आणि आचार्य विनोबा भावे हे भारतातील महान पर्यटक होते. कुठल्याही सुविधा नसताना या महान तपस्वींनी चारीधाम यात्रा केल्या. नंतर आपल्या विचारांचा ठसा देशाच्या नेतृत्वाला दिला, असे अरुण साधू यांनी सांगितले. प्रवास करताना मन आणि कान उघडे ठेवल्यास पर्यटनाचा पूर्ण आनंद मिळतो, असे गिरिजा कीर म्हणाल्या.
तर सध्याच्या  स्थितीत ताणतणाव मुक्त राहण्यासाठी पर्यटन करणे गरजेचे आहे, असे सुराडकर आपल्या भाषणात म्हणाले. प्रास्ताविक उदयराव चितारी यांनी केले. गेली अनेक वर्षे चितारी ट्रॅव्हल्सबरोबर प्रवास करणाऱ्या आणि वयाची ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या रमेश जोशी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.