राज्य कला संचालनालयच्या ५३ व्या राज्य कला प्रदर्शनासाठी रचना कला महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रमोद जगताप यांनी काढलेल्या दोन चित्रांची निवड झाली. मुंबईतील जहांगीर कलादालनात ५ फेब्रुवारीला हे प्रदर्शन होत असून त्यात राज्यातील अनेक चित्रकारांच्या कलाकृती असतात. तैलरंगात साकारलेले लेडी इन ऑरेंज, तसेच जलरंगात केलेले ढवळ्या अशा जगताप यांच्या दोन चित्रांची निवड या प्रदर्शनासाठी झाली. दोन्ही चित्रे उत्कृष्ट कलाकृती असून प्रदर्शनातील सहभागामुळे त्यांना आता चित्रकलाक्षेत्रातील अनेक नामवंतांची दाद मिळेल. प्रा. जगताप रचना कला महाविद्यालयाचेच विद्यार्थी असून नगरचेच प्रसिद्ध चित्रकार दिवंगत अर्जुनराव शेकटकर यांच्याकडून त्यांनी कलाशिक्षण घेतले. जे. जे. स्कूल ऑफ ऑर्ट येथे त्यांचे पुढील शिक्षण झाले. प्रा. जगताप यांच्या ग्रॅनी या व्यक्तीचित्राला यापूर्वी अखिल भारतीय कला प्रदर्शनात व्ही. व्ही. ओक राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आई-वडील, तसेच गुरूंचे आर्शीवाद यामुळेच हातातून चित्र साकारले जाते, ही तर सुरूवात असून यापेक्षा अधिक यश मिळवायचे आहे, असे मनोगत जगताप यांनी व्यक्त केले.