प्रणाली रहाणे या युवतीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि तिच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी शुक्रवारी समस्त शिंपी समाज संस्था व संघटना आणि विद्यार्थिनींच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. प्रणालीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांबरोबर कारखाना व्यवस्थापनाविरुद्धही गुन्हा दाखल करावा, तिच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे, अशीही मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.
सहकाऱ्यांच्या छळाला कंटाळून येथील बॉश कारखान्यातील प्रशिक्षणार्थी प्रणाली प्रदीप रहाणे हिने आत्महत्या केली होती. याच ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणारे १० कर्मचारी गेल्या तीन वर्षांपासून आपला मानसिक छळ करत असल्याचे प्रणालीने चिठ्ठीमध्ये म्हटले होते. या प्रकरणी पोलिसांनी १० जणांना अटक करून त्याची पोलीस कोठडीत केली आहे. या पाश्र्वभूमीवर, विद्यार्थी व शिंपी समाज संघटना यांच्यातर्फे मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक विद्यार्थिनी काळ्या फिती लावून आणि वेगवेगळ्या मागण्यांचे फलक घेऊन मोर्चात सहभागी झाल्या होते. औद्योगिक क्षेत्रात कार्यरत महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशाखा समिती स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. संबंधित कारखान्यात ही समिती अस्तित्वात असेल तर प्रणालीच्या होणाऱ्या मानसिक छळाची माहिती देणे आवश्यक होते. परंतु, तसे न झाल्यामुळे प्रणालीला आत्महत्या करावी लागल्याचे मोर्चेकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. या घटनेमुळे प्रणालीच्या कुटुंबियांचा आर्थिक आधार निखळला आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांबरोबर बॉश कारखाना व्यवस्थापनावरही गुन्हा दाखल करावा, प्रणालीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी, पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून कारखान्यातील प्रणालीचे वैयक्तिक कपाट सील करावे.
 या प्रकरणी शासनाने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी, प्रणालीच्या कुटुंबियांना कारखाना आणि शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळावे, तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी नोकरी देण्याची लेखी हमी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. भविष्यात संशयितांकडून प्रणालीच्या कुटुंबियांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.