जातीच्या दाखल्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना इस्लामपूर प्रांत कार्यालयातील शिरस्तेदाराला एजंटासह मंगळवारी लाचलुचपत विभागाने अटक केली. जातीच्या दाखल्यासाठी या शिरस्तेदाराने ९० हजार रुपयांची मागणी केली होती.
शंकर जयवंत पाटणकर (रा. बोरगाव, ता. वाळवा) याला जातीचे प्रमाणपत्र हवे होते. त्यासाठी त्याने तहसील कार्यालयात रितसर मागणी अर्ज केला होता.  मागणी अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडूनही प्रांत कार्यालयातून हा दाखल मिळण्यास विलंब लागला होता.
जातीचा दाखला हवा असेल तर ९० हजार रुपये द्यावे लागतील, असे प्रांत कार्यालयातील सुनील ज्योतीराम चव्हाण यांनी पाटणकर याला सांगितले होते. यापकी ३० हजार रुपये घेताना एजंट वैभव भगवान कोकाटे हा आज लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला. ही रक्कम त्याने शिरस्तेदार चव्हाण यांच्यासाठी स्वीकारली असल्याचे कबूल केले असून लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक बाबर व त्यांच्या पथकाने एजंट वैभव कोकाटे व शिरस्तेदार सुनील चव्हाण या दोघांना मंगळवारी अटक केली. दोघांविरुद्ध इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.