मुलांचा सर्वागीण विकास होण्यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध कलागुणांना पैलू पाडण्याची गरज असते. ठाण्यातील प्रारंभ कला अ‍ॅकॅडमी विद्यार्थ्यांमधील कलागुणांना विकसित करण्यासाठी प्रयत्न करत असून याच उद्देशाने ही संस्था बालमहोत्सवाचे आयोजन करते. यंदा ११ व १२ जानेवारी दरम्यान गडकरी रंगायतनमध्ये सकाळी ९ ते २ या वेळेत हा बालमहोत्सव होणार आहे.
अरुंधती भालेराव संचलित प्रारंभ कला अ‍ॅकॅडमीच्या वतीने या बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या बाल जल्लोषात मुलांसाठी एक मिनिट खेळ, स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित बालनाटय़ ‘ज्ञानयोगी स्वामी विवेकानंद’ पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे. प्रारंभचे कलाकार या महोत्सवात विविध बालनाटय़ सादर करणार आहेत. त्याचबरोबर जादूचे प्रयोग, बोलक्या बाहुल्यांचे खेळ आणि खाऊचे वाटप या महोत्सावात होणार आहे. या महोत्सवामध्ये तन्वी हर्बलच्या वतीने महाराष्ट्रातील निवडक मुलांना तन्वी स्टार अ‍ॅवॉर्ड देण्यात येणार आहे. मुलांनी या उपक्रमात सहभाग घेऊन महोत्सवाचा आनंद लुटावा, असे आवाहन प्रारंभच्या संचालिका डॉ. अरुंधती भालेराव यांनी केले आहे.