महाविद्यालयात जाणारा तरुण, एका लहान मुलाचा बाप आणि म्हातारपणी खचलेला बाप असा संपूर्ण आयुष्याचा आलेख एकाच कलाकाराच्या वाटय़ाला एकाच चित्रपटात आला तर? तर त्या कलाकारासमोर तो आलेख साकारणे नक्कीच आव्हान असेल. सध्या हे आव्हान स्वीकारले आहे ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ ठरलेल्या प्रसाद ओक या अभिनेत्याने! गायन, नृत्य आणि अभिनय या तीनही कलांमध्ये आपले नाणे खणखणीत वाजवणारा प्रसाद सध्या ‘माझा मी कधीच नव्हतो’ या चित्रपटात अशा प्रकारचा आलेख असलेली मध्यवर्ती भूमिका साकारत आहे.
तीन पिढय़ांची भूमिका एकाच चित्रपटात साकारणे, हे नेहमीच आव्हानात्मक असते. मात्र आपल्याला अशा आव्हानात्मक भूमिका करायला नेहमीच आवडत आलेले आहे. त्यामुळे आपल्या अभिनयाचा कस लागतो, असे प्रसादने ‘रविवार वृत्तांत’शी बोलताना सांगितले. निनाद वनगे आणि अतुल वनगे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे, अतुल वनगे यांनी लिहिलेल्या एका कवितेवरून या चित्रपटाची पटकथा लिहिण्यात आली आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी आम्हाला एका अत्यंत गुणी आणि कसदार अभिनेत्याची गरज होती. हा अभिनेता कोणत्याही इमेजमध्ये अडकलेला नसावा, असेही आमचे मत होते. त्यामुळे आम्ही अनेक जणांचा विचार केल्यानंतर प्रसादची निवड केल्याचे निर्माते आणि दिग्दर्शक या दोघांनीही सांगितले. ही भूमिका आपल्या आतापर्यंतच्या भूमिकांमधील एक सवरेत्कृष्ट आहे, असे प्रसादने सांगितले. प्रसाद सध्या भद्रकाली प्रोडक्शनचे ‘बेचकी’ हे नाटकही करत आहे. त्याशिवाय जानेवारी महिन्यात त्याचा ‘सत्या’ नावाचा चित्रपटही येत आहे. तसेच प्रसादची मुख्य भूमिका असलेला ‘गाजराची पुंगी’ हा चित्रपट मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे.