* बंद शांततेत
*  वाघदर्डी धरणात तीन तास ठिय्या

शहरासाठी पालखेड धरणातून त्वरीत पाणी सोडावे या मागणीसाठी गुरूवारी मनमाड शहर पत्रकार संघाने पुकारलेला ‘मनमाड बंद’ सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिल्यामुळे शांततेत पार पडला. मोर्चा काढून निदर्शकांनी थेट वाघदर्डी धरणावर धडक देत ठणठणीत झालेल्या धरणात सुमारे तीन तास ठिय्या दिला.
दरम्यान, प्रांताधिकारी उदय किसवे, तहसीलदार सुदाम महाजन यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट संपर्क साधला. पण १० मार्चपूर्वी पाणी दिले जाणार नसल्याचे स्पष्ट झाले. शहरातील वाघदर्डी धरण व पर्यायी योजनेतील पालखेड धरणांतर्गत पाटोदा तलावातील पाणी आठ दिवसांपासून संपल्याने शहरावर भीषण पाणी टंचाईचे सावट पसरले आहे. यावर तातडीने मार्ग म्हणून १० मार्च रोजी देण्यात येणारे पालखेडचे पाणी त्वरित देण्याची मागणी करीत पत्रकार संघाने गुरूवारी बंदचे आवाहन केले होते. त्यास काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, रिपाइं, मनसेसह सर्व राजकीय पक्ष संघटनांनी पाठिंबा दिल्याने आंदोलनाची धार तीव्र झाली.
विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन शहराच्या विविध भागातून मोर्चा काढत आंदोलकांनी वाघदर्डी धरणाकडे कूच केले.  कोरडय़ाठाक धरणाच्या पात्रात आंदोलकांनी ठिय्या दिला. घोषणांनी धरणाचा परिसर दणाणला. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. नांदगावचे तहसीलदार सुदाम महाराज यांनी आंदोलकांची भेट घेत मागण्या शासनस्तरावर पोहोचविण्याचे आश्वासन दिले. पाणी त्वरीत सोडण्याचे आश्वासन लेखी दिल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यानंतर मालेगावचे प्रांताधिकारी उदय किसवे घटनास्थळी दाखल झाले. १० मार्चआधी पाणी सोडण्याचे वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले जातील. याशिवाय टंचाई निवारणासाठी २० टँकरसह विविध योजना मनमाडकरांसाठी उपाय योजण्यात आल्याचे किसवे यांनी सांगितले. मात्र त्यामुळे आंदोलकांचे समाधान झाले नाही. जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा झाली पण मार्ग निघत नसल्याने पोलिसांनी आंदोलकांना अटक केली.