लग्नाच्या दिवशी वधू-वर आणि पाहुण्यांची छबी टिपणारे कॅमेरे आणि संपूर्ण सोहळ्याचे चित्रीकरण करणारे व्हिडीओग्राफर्स नवे नाहीत. सध्या केवळ लग्न नाही तर दोघांच्या पहिल्या भेटीपासून ते एकमेकांना लग्नासाठी होकार देण्यापर्यंतचे सर्व क्षण पुन्हा अनुभवून त्यांचे छोटय़ाशा फिल्म स्वरूपात जतन करण्यास तरुणाई पसंती देत आहे. त्यामुळे सध्या जोडप्यांच्या लग्नापर्यंतचा प्रवास सांगणाऱ्या ‘प्री वेडिंग व्हिडीओज’ चित्रित करण्याचे प्रमाण वाढते आहे. त्यासाठी पाच ते सहा लाखांपर्यंत खर्च करण्याचीही यजमानांची तयारी असते.
लग्न ठरल्यावर दोघे पहिल्यांदा कधी भेटले, पहिला चित्रपट कोणता पाहिला, कोणी कोणाला लग्नासाठी पहिल्यांदा विचारले, असे असंख्य प्रश्न विचारून जोडप्याला भंडावून सोडले जाते. मग त्यांनाही थोडे आढेवेढे घेत, लाजत आपल्या जुळलेल्या विवाहाची गोष्ट सांगावी लागते. सध्या सोशल मीडियामुळे वाढलेल्या मित्रपरिवारातील प्रत्येकाला वैयक्तिकरीत्या हे सांगणे शक्य नसते. त्यामुळे पहिल्या भेटीपासून ते लग्न ठरण्यापर्यंतचा प्रवास पुन्हा अनुभवून तो कॅमेरामध्ये बंदिस्त करण्याचा पर्याय तरुणाईने निवडला आहे. यासाठी लग्न ठरल्यावर ‘प्री वेडिंग शूट’ करणाऱ्या व्हिडीओग्राफर्सना गाठले जाते. ‘पूर्वी जोडपी लग्नाआधी खास फोटोशूट करून घ्यायची. त्यातून व्हिडीओची संकल्पना पुढे आली,’ असे व्हिडीओग्राफर सरीन सवरकर याने सांगितले.
प्रेमविवाह ठरलेली जोडपी त्यांच्या पहिल्या भेटीपासून ते आई-वडिलांच्या मनधरणीपर्यंतची गोष्ट यात सांगतात. तर आई-वडिलांच्या पसंतीने लग्न करणारे जोडपे त्यांच्या कांदेपोह्य़ांच्या कार्यक्रमापासून ते लग्नापर्यंतची कहाणी कथन करतात. त्यासाठी विविध ठिकाणी चित्रीकरण केले जाते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, कॉफी शॉप्स, कॉलेजचे कट्टे, मॉल्स ही चित्रीकरणासाठी जोडप्यांची पसंतीची ठिकाणे असल्याचे व्हिडीओग्राफर सागर रणदिवे याने सांगितले.

सव्वा लाखांची फिल्म
एका फिल्मच्या चित्रीकरणासाठी साधारणपणे एक ते दोन दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर महिन्याभरात फिल्म पूर्ण होऊन जोडप्यांच्या हाती येते. लग्नापूर्वी मित्रपरिवार आणि नातेवाईकांना दाखविण्यासाठी सोशल मीडियावर या फिल्म्स जोडप्यांकडून हमखास अपलोड केल्या जातात. एका फिल्म्सच्या चित्रीकरणासाठीचा खर्च साधारण ५० हजार रुपये ते पाच-सहा लाख रुपयांच्या आसपास जातो. त्यामुळे आयटी क्षेत्रामध्ये काम करणारी, गलेलठ्ठ पगार मिळविणारी जोडपी या फिल्म्स बनविण्यास पसंती देत असल्याचे सरीन म्हणाला. सध्या यांच्या एकूण ग्राहकांपैकी ७० टक्के गुजराती आणि मारवाडी समाजातील असून ३० टक्के मराठी तरुण आहेत. लग्नाच्या दिवशीही निव्वळ आहेर देताना पाहुण्यांसोबत फोटो काढण्यापेक्षा लग्नावरही फिल्म करण्यास जोडपी पसंती देतात. त्यात त्यांच्या घरचे, नातेवाईक, मित्र यांचे शुभेच्छा संदेश, काही गमतीजमती यांचा प्रसंगानुरूप समावेश केला जातो. अशा प्रकारच्या फिल्म तयार करण्याचा खर्च सुमारे सव्वा लाखपासून सुरू होतो.

लग्नपत्रिकांचेही ट्रेलर
प्रत्येकाच्या घरात जाऊन लग्नपत्रिका देणे सध्या शक्य नसते. कित्येकदा एकमेकांच्या वेळा जुळून येणेही अडचणीचे असते. त्यामुळे लग्नपत्रिकांऐवजी सर्वाना लग्नाचे आमंत्रण देणारे छोटेखानी व्हिडीओज बनवून फेसबुकवर अपलोड करण्यास किंवा व्हॉट्सअपवरून नातेवाईक, मित्रांना पाठविण्यासही तरुणाई पसंती देऊ लागली आहे. या छोटेखानी व्हिडीओजचा खर्च ५ ते ६ हजारांपर्यंत असतो.