शहरात स्वाईन फ्लूचा फैलाव वाढत असून संशयित रुग्णांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. एका वृद्ध महिलेसह दोघांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. आणखी दोघांना जिल्हा रुग्णालयातील विशेष कक्षात दाखल करण्यात आले असून जिल्ह्यातील आठ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. या पाश्र्वभूमीवर, त्रास जाणवू लागताच नागरिकांनी त्वरित तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सकांनी केले आहे.
जळगावचे तापमान सध्या ४० अंशावर पोहोचले असताना स्वाईन फ्लूची साथ पसरत असल्याचे दिसत आहे. गुलाम रईस अंसारी (३३) या मेहरूण परिसरातील तरूणाचा या आजाराने मृत्यू झाल्यानंतर जिल्हा व पालिका प्रशासन हादरले. त्यानंतर जिल्हा रुग्णालय व पालिकेच्या शाहु महाराज रुग्णालयात विशेष कक्ष सुरू करण्यात आले. त्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा तातडीने उपलब्ध करण्यात आल्या. स्वाईन फ्लुमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पाश्र्वभूमीवर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एन. लाळीकर यांनी त्रास जाणवू लागताच तातडीने तपासणी करावी आणि उपचार करून घ्यावे, असे आवाहन केले आहे. स्वाइन फ्लू आजारावर टॅमी फ्लू ही गोळी हाच उपचार असल्याचे त्यांनी नमूद केले. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे १२५ संशयित रुग्ण असून त्यातील पाच जणांचे नमुने पॉझिटीव्ह असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी जिल्हा रुग्णालय व महापालिका रुग्णालयात समन्वय राखण्याच्या सूचना दिल्या आहेत. सामान्य रुग्णालयात ऑक्सीजन व्हेंटीलेटर, टॅमी फ्लूच्या चार हजार गोळ्या, मास्क आदी साहित्याची उपलब्धता करण्यात आली आहे.