‘व्हॅलेंटाइन डे’ जवळ येऊ लागला की बाजारपेठा सुंदर टेडी, सॉफ्ट टॉईज यांनी फुलून जातात. पण यंदा मात्र ‘व्हॅलेंटाइन डे’ जवळ येऊनही बाजारात या पारंपरिक भेटवस्तूंना म्हणावी तशी मागणी नाही. त्याऐवजी ब्रॅण्डेड ज्वेलरी, कपडे, पस्र्नलाइज्ड भेटवस्तू यांना तरुणाई जास्त महत्त्व देऊ लागली आहे. याशिवाय महागडय़ा हॉटेल्समध्ये जेवण, स्पा-ट्रीटमेंट्स, एकमेकांच्या नावाचे टॅटू काढणे याचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसते आहे.
‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणजे गुलाबाचे फूल आणि एक छान चॉकलेट अशी कल्पना तरुणांच्या डोक्यातून पुसली गेली आहे. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने ब्रॅण्डेड भेटवस्तू खरेदी करण्याकडे तरुणांचा कल वाढत आहे. त्यामुळे कित्येक ब्रॅण्ड्ससुद्धा यानिमित्ताने विविध ऑफर्स तसेच खास कलेक्शन्स घेऊन बाजारामध्ये उतरले आहेत. ‘फॉरेव्हर डायमंड’, ‘तनिष्क’, ‘जेट जेम्स’ ‘टायटन’, ‘फ्रेंच कनेक्शन’, ‘हायपरसिटी’ अशा कित्येक ब्रॅण्ड्सनी ज्वेलरी, घडय़ाळे, कपडे, फोटोफ्रेम्स यांची खास रेंज बाजारात आणली आहे. त्याचबरोबर ‘सहारा स्टार्स हॉटेल’, ‘इमॅजिका’, ‘एस्सेल वर्ल्ड’ येथे व्हॅलेंटाइन डेसाठी खास मेन्यू डिझाईन, डेकोरेशन्स करण्यात आले आहे. केक्स शॉप्सही व्हॅलेंटाइन डे स्पेशल केक्स घेऊन आले आहेत. तसेच स्पा पार्लर्स, ब्युटी पार्लर्सनी विविध ट्रीटमेंट्सवर जोडप्यांसाठी सवलती देऊ केल्या आहेत.
ऑनलाइनची बाजी
‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी जोडप्यांसाठी ब्रंचपासून ते डिनपर्यंत विविध वेळेला साजेसे लुक्स ‘जबाँग डॉट कॉम’ने डिझाइन करून दिले आहेत, तर ‘आस्क मी डॉट कॉम’ने या दिवशी काही भाग्यवंतांना कंगना रानावतला भेटण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ‘झामोर डॉट कॉम’, ‘स्नॅपडील डॉट कॉम’, ‘फ्लिपकार्ट डॉट कॉम’ने त्यांच्या खास कलेक्शन्सवर सवलत जाहीर केली आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’ला भेटवस्तू देण्यासाठी कित्येक साइट्स नवीन आणि खूप पर्याय उपलब्ध झाल्याने ऑनलाइन खरेदीला पसंती दिल्याचे मुंबईची स्पृहा सतपाळ सांगते.