‘समांतर’चे काम ३० मार्चपूर्वी
महापालिकेला यंदा आर्थिक चणचण जाणवेल. ७७६ कोटींचा अर्थसंकल्प तयार केला होता. त्यात १०० कोटी सरकारकडून मिळतील, असे गृहीत धरण्यात आले. तेवढी रक्कम मिळणार नाही व वसूलही तेवढी होणार नाही. त्यामुळे मिळणाऱ्या निधीतून किती व कसा खर्च करायचा, तसेच आर्थिक शिस्त कशी लावायची, हा प्राधान्याचा मुद्दा असल्याचे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले. कोणत्याही स्थितीत ३० मार्चपूर्वी समांतर पाणीपुरवठा योजनेचे कामकाज मार्गी लावण्याचा प्रयत्न असेल, असेही कांबळे यांनी पत्रकार बैठकीत स्पष्ट केले.
मनपाला आर्थिक शिस्त लावण्याची गरज असून केलेले अंदाजपत्रक व येणारी रक्कम याचा विचार करून कामे हाती घेतली जातील, असे त्यांनी सांगितले. रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन व अन्य प्रक्रियांसाठी ७० कोटींची गरज आहे. हे गणित जुळवावे लागेल. पिण्याच्या पाण्यास प्रथम प्राधान्य असले तरी अर्थसंकल्पात मोठी तूट राहू शकेल, असेही ते म्हणाले. वसुलीच्या अनुषंगाने आढावा घेतला असून वॉर्ड अधिकाऱ्यांबरोबरही बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेत प्रशासकीय स्तरावर अनागोंदी असल्याच्या तक्रारीचा उल्लेख पत्रकारांनी केला. कागदविरहित प्रशासन चालविण्याची सॅप प्रणाली अंमलबजावणीत तातडीने आणणे कितपत शक्य होईल याविषयी शंका आहे, असे डॉ. कांबळे म्हणाले. वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय महापालिकेत होत असतात. त्यामुळे लगेच कागदविरहित प्रशासन करता येईल, असे वाटत नाही. पण काही विभाग व काही कागदपत्रे टाळून संगणकावर माहिती ठेवता येऊ शकते का, याचे प्रयोग केले जातील. प्रस्तावित ३० रस्त्याच्या रुंदीकरणावर ५० कोटींपेक्षा अधिक खर्च झाला आहे. उर्वरित २० रस्ते तयार करण्यासाठी मार्ग काढू, असेही त्यांनी सांगितले.
महापालिकेतील संचिकांना लागलेल्या आगीसंदर्भात आढावा घेतला असून या पुढे असे प्रकार होऊ नयेत म्हणून सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले. नव्यानेच रुजू झालेल्या आयुक्तांनी पूर्वी प्रशासनात केलेल्या अनुभवांच्या आधारे चांगले काम करू, असा विश्वास या वेळी व्यक्त केला.
दरम्यान, महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमतर्फे जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद गायकवाड, अभियंता सुनील खंडारे, भारत शिंदे, कृष्णा भंडारे, प्रा. जाधव आदींनी नवे आयुक्त डॉ. कांबळे यांचा सत्कार केला.