गर्भवती महिलांना प्रसूतीबद्दलची, उपचारांची माहिती, गोळ्या घेण्याची आठवण तसेच पारंपरिक गरसमजुती दूर करून माता-बालक यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महानगरपालिकेच्या शीव रुग्णालयात डिसेंबरमध्ये अरमान संस्थेकडून सुरू करण्यात आलेल्या व्हॉइस कॉलचा लाभ आता पालिकेच्या सर्वच प्रसूतिगृहांतील महिलांना मिळणार आहे.
पालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात २०११ मध्ये प्राथमिक पातळीवर ही सेवा सुरू झाली होती. या रुग्णालयात येत असलेल्या गर्भवती महिला अशक्त असल्याने त्यांच्यासाठी लोह तसेच इतर पोषक आहाराची माहिती देण्यासाठी सुरू झालेल्या या योजनेचा अनेकींना लाभ झाला. त्यानंतर सोलापूर, वाशिम व उस्मानाबाद या जिल्हय़ांत जानेवारी २०१३ मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली. पारंपरिक समज, प्रथांमधून िबबवल्या गेलेल्या समजुतींप्रमाणे वागताना अनेकदा माता व बालक या दोघांचेही आरोग्य धोक्यात येते. गर्भारपणाच्या टप्प्यांमध्ये कोणता आहार, औषधे घ्यावीत याचीही माहिती अनेकींना नसते.
मोबाइलमधले मेसेज वाचणे प्रत्येकीला शक्य नसल्याने फोन करून माहिती देण्याचा उपक्रम या प्रकल्पाअंतर्गत घेण्यात आला. लो. टिळक रुग्णालयात २० डिसेंबर २०१३ रोजी मराठी व िहदीतून सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता पालिकेच्या रुग्णालयांमध्ये येणाऱ्या सर्वच गर्भवती महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. अरमान संस्थेने यासाठी मोबाइल मित्र या सेवेसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोबाइल अलायन्स फॉर मॅटर्नल अ‍ॅक्शन या संस्थेची मदत घेतली आहे.
या सेवेमध्ये गर्भवती महिलांना या प्रकल्पाची माहिती देऊन त्यांचा मोबाइल किंवा लॅण्डलाइन क्रमांकांची नोंद केली जाते. या क्रमांकावर दिवसातून कोणत्या वेळी कॉल करावा, त्याची माहितीही घेतली जाते.गर्भारपणात आठवडय़ातून दोन वेळा, तर प्रसूती झाल्यावर पहिल्या आठवडय़ात रोज, तीन महिन्यांनंतर आठवडय़ाला दोन व नंतर आठवडय़ातून एकदा कॉल केला जातो.गर्भवती महिलांनी घ्यायची काळजी, गर्भाची हालचाल, त्यावरून अंदाज, स्वत:ची काळजी, लसीकरण, डॉक्टरकडे जाण्याच्या वेळा, औषध घेण्याची आठवण या कॉलमधून केली जाते.
प्रसूती सुखरूप पार पडली किंवा कॉल घेता आला नाही किंवा सेवा बंद करायची असल्यास संस्थेने दिलेल्या क्रमांकावर मिस्ड कॉल देता येतो. त्यानंतर संस्थेकडून संपर्क करून समस्या सोडवली जाते.