येत्या ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान पंढरपुरात अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. या नाटय़संमेलनासाठी तीन रंगमंच उभारण्यात आले आहेत. १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमाार शिंदे यांच्या हस्ते या नाटय़संमेलनाचा उद्घाटन सोहळा होणार आहे. तर समारोप केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत केला जाणार आहे. हे नाटय़संमेलन ‘अविस्मरणीय’ ठरण्यासाठी संयोजकांची लगबग सुरूच आहे.
नाटय़संमेलनाच्या मुख्य व्यासपीठाला दिवंगत ज्येष्ठ रंगकर्मी विनय आपटे यांचे नाव देण्यात आले आहे, तर अन्य रंगमंचांना सतीश तारे व गो. पु. देशपांडे यांची नावे देण्यात आली आहेत. नाटय़संमेलनाला उद्या गुरुवारी सायंकाळी ‘गाढवाचं लग्न’ या नाटय़प्रयोगाने प्रारंभ होणार आहे. तर दि. ३१ रोजी सायंकाळी सात वाजता ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ व रात्री नऊ वाजता ‘पती सगळे उचापती’ हे नाटक सादर होणार आहे.
१ फेब्रुवारी रोजी नाटय़संमेलनास खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. सकाळी सात वाजता नाटय़दिंडीला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर सकाळी दहा वाजता उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे उद्घाटक आहेत. संमेलनाध्यक्ष अरुण काकडे यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे. त्यानंतर दुपारच्या सत्रात अभिरूप न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. यात मोहन आगाशे, विश्वास मेहेंदळे, प्रा. लक्ष्मण ढोबळे, विजय केंकरे, मंगेश कदम, आनंद म्हसवेकर आदी मंडळी सहभागी होणार आहेत.
रात्री कलावंत रजनी कार्यक्रमात जयंत सावरकर, फैयाज, रमेश भाटकर, सचिन खेडेकर, डॉ. गिरीश ओक, विजय कदम, मंगेश कदम, सुकन्या कुलकर्णी, अरुण नलावडे, अजय पूरकर, केतकी थत्ते, संजीवनी मुळे-नगरकर, सुनील बर्वे, पुष्कर श्रोत्री, अतुल परचुरे, डॉ. अमोल कोल्हे, अमृता सुभाष, वसंत अवसरीकर, प्रसाद ओक, मोहन जोशी, सविता मालपेकर, अदिती सारंगधर आदी कलावंत मंडळी सहभागी होत आहेत. याशिवाय राजाराम शिंदे, सुरेश खरे, श्रीकांत मोघे, राम जाधव, रामदास कामत, दत्ता भगत, लालन सारंग, प्रमोद भुसारी, दीपक करंजीकर, लता नार्वेकर यांचीही उपस्थिती राहणार आहे. बालनाटय़ेही सादर होणार आहेत.
२ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात पदन्यास बॅले ग्रुप मुंबई निर्मित ‘मी महाराष्ट्र बोलतोय’ सादर होणार असून त्यानंतर तुमडी गायन, लोकनाटय़ व इतर कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. सायंकाळी पाच वाजता खुले अधिवेशन व संमेलनाचा समारोप होणार आहे. या वेळी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. रात्री ‘करून गेलो गाव’ हे नाटक (ग्रेट मराठा एन्टरटेन्मेंट कंपनी प्रस्तुत) सादर होणार आहे.