सार्वजानिक गणेशोत्सव मंडळाप्रमाणे विदर्भातील विविध भागात असलेल्या अपार्टमेंट्स व सोसायटय़ांमध्ये गणेशोत्सवात वेगळा उत्साह दिसून येत आहे. घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. अपार्टमेंट्स किंवा सोसायटय़ांमध्ये एरवी एकमेकांपासून दूर राहणारे गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांत सर्वजण एकत्र येत असून उत्सवाचा आनंद लुटत आहेत.
शहरातील विविध भागात फेरफटका मारला असताना शहरातील अपार्टमेंट्स किंवा सोसायटय़ांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल दिसून येते. गेल्या दहा बारा वर्षांत विदर्भातील विविध जिल्ह्य़ात आणि शहरात निवासी संकुले मोठय़ा प्रमाणात उभारली जात असून त्यात विविध जाती धर्मातील लोक एकत्र राहत असतात. प्रत्येकाचे उत्सव, सण हे वेगवेगळे असले तरी गणेशोत्सवाच्या निमित्ताने मात्र सर्व एकत्र येऊन साजरा तो करीत असतात. उत्सवाच्या किमान दोन महिने आधीपासून गणपतीची मूर्ती आणायला कोण जाणार पासून ते रोजचा प्रसाद, कार्यक्रमाची तयारी ते विसर्जनाची व्यवस्था ठरविण्यापर्यंत अपार्टमेंटमध्ये सामूहिकपणे निर्णय घेतले जातात. हे निर्णय घेत असताना काही स्वतला ‘एज्युकेट’ समजणारे या सर्व गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत असतात मात्र तेही अपार्टमेंटमधील अन्य लोकांचा उत्साह बघून आपणहून सहभागी होत असतात. एरवी अपार्टमेंटमघ्ये कुठलेही काम करायचे असेल पैशासाठी पुढे मागे पाहणारे अनेक फ्लॅटधारक गणेश उत्सवात मात्र स्वतहून वर्गणीशवाय अन्य कामासाठी पैसा खर्च करीत असतात.
साधारणात: अपार्टमेंट किंवा सोसायटीमध्ये गणेशोत्सव म्हटला की सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी महिना-दोन महिने आधीच सुरू होते. रंगीत तालमींना रंग भरतो. पुरुष मंडळींच्या बैठका कोणाच्या तरी घरी सुरू होतात आणि महिला, युवती इतर कार्यक्रमांच्या तयारीला लागतात. सोसायटी हे तसे एक अजब रसायन आहे. सोसायटीतील सर्व कुटुंबांचे वर्षभर तसे स्नेहाचे संबंध असतातच असे काही नाही. ते कोणत्याही छोटय़ा-मोठय़ा कारणांनी बिघडू शकतात आणि बिघडतातही. ही कारणे म्हटली, तर तशी अगदी क्षुल्लकच. पण तेवढय़ानेही सोसायटय़ांमध्ये ‘युद्धजन्य परिस्थिती’ निर्माण होते. प्रॉपर्टी टॅक्सची बिले वाटण्याचे काम कोणाचे, तळमजल्यावरील फ्लॅटधारकांनी लिफ्टचा ‘मेन्टेनन्स’ द्यायला दिलेला नकार, पाण्याची मोटार पहाटे आम्ही वेळेवर सुरू करतो; मग ‘बी’ िवगमधल्यांना ते का जमू नाही, दर वेळी काय ‘मीच ठेका घेतलाय का, टेरेस फक्त सचिव आणि पदाधिकारीच वापरतात.. आमच्या घरासमोर कचरा पडलेला दिसतो, तुमच्या घरासमोरचा मात्र कचरा उचलला जातो, तुमच्याकडील लहान मुले फारच गोंधळ घालतात, पार्किंगमध्ये माझ्या जागेवर गाडी ठेवली, या आणि अशा इतर अनेक कारणांनी सोसायटय़ांमध्ये अनेकदा ‘अशांतता’ निर्माण होते आणि ही परिस्थिती एकाच निमित्ताने ‘शांत’देखील होते, ते निमित्त म्हणजे गणेशोत्सव!
महाल, नंदनवन, लक्ष्मीनगर, सुरेद्रनगर, पांडे ले आऊट, गोकुळपेठ, अत्रे लेआऊट, नरेंद्र नगर, रेशीमबाग, देवनगर, गजानननगर, टिळकनगर, धरमपेठ आदी शहरातील विविध भागातील अपार्टमेंट किंवा सोसायटीमध्ये गणेशोत्सवानिमित्त दहाही दिवस सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. काही ठिकाणी दोन अपार्टमेंटमधील फ्लॅटधारक एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. उत्सव आला की, वाद-विवाद, कडू-गोड सारे संपते. सर्वजण झपाटल्यासारखे उत्सवाच्या तयारीला लागतात. आरास, सजावट अशी सारी कामे महिला-पुरुष, तरुण-तरुणी एकत्र येऊन करतात. कामे करण्याची अगदी अहमहमिका लागते. थोडक्यात इथे ‘प्रत्येक हाताला काम’ असते. या कार्यकर्त्यांची चहा-पाणी, नाश्त्याची व्यवस्था करण्यासाठी अनेक घरातील वहिनी मग आपुलकीने पुढे येतात. सोसायटीच्या गणेशोत्सवाची खरी पर्वणी असते बालगोपाळांसाठी. छोटय़ा-मोठय़ा कारणांसाठी कॉन्ट्रॅक्ट देण्याची पद्धत सोसायटीच्या उत्सवात अजिबात नसते. सर्व कामे वाटून घेतली जातात. सजावटीचे कामही अपार्टमेंटमधील बालगोपाल करीत असतात. घरातील वडीलधारी मंडळी या बालगोपालांना मदत करीत असतात. ‘रेडिमेड’पेक्षाही कामात अनेकांचे हात लागण्याला इथे जास्त महत्त्व दिले जाते.
सोसायटय़ांतील कार्यक्रमांमध्येही केवढे वैविध्य असते. मुलांची आवर्तने, पाठांतर स्पर्धा, हिंदी-मराठी गीतांचा वाद्यवंृद, छोटय़ांचे विविध गुणदर्शन, अगदी टीव्ही चॅनेलप्रमाणेच सासू-सून, होम मिनिस्टर, रांगोळी, खमंग पाककृती अशा महिलांच्या स्पर्धा, गाणी, नाटके, भेंडय़ा, अंताक्षरी.. ही यादी आणखीही खूप, खूप लांबू शकते. मुख्य म्हणजे गेल्या काही वर्षांत सोसायटय़ांमधील उत्सव अधिकाधिक स्वयंस्फूर्त, स्वयंप्रेरणेचा, स्वशिस्तीचा, आबालवृद्धांच्या वाढत्या सहभागाचा होतो हे तितकेच खरे.