राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे येत्या २९ डिसेंबर रोजी सोलापूर व पंढरपूरच्या भेटीवर येणार आहेत. डॉ. निर्मलकुमार फडकुले नाटय़गृह व कुंभारीतील अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन, पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन तसेच पंढरपूर अर्बन को-ऑप. बँकेचा शताब्दी महोत्सव सोहळा अशा विविध भरगच्च कार्यक्रमांना राष्ट्रपती मुखर्जी हजेरी लावणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जात आहे. तर, पोलीस सुरक्षा यंत्रणाही कामाला लागली आहे.
दि. २९ रोजी राष्ट्रपती मुखर्जी हे सकाळी हैदराबाद येथून बीदर येथे हवाई दलाच्या केंद्रावर येऊन नंतर तेथून हवाई दलाच्या विमानाने सोलापूरला येणार आहेत. सकाळी ११.३० वाजता त्यांचे सोलापूर नगरीत आगमन होईल. सकाळी ११.४५ वाजता सिध्देश्वर मंदिराजवळ भुईकोट किल्ल्यालगत उभारण्यात आलेल्या डॉ. निर्मलकुमार फडकुले नाटय़गृहाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर अक्कलकोट रस्त्यावरील कुंभारी येथे एम. एम. पटेल चॅरिटेबल ट्रस्टने उभारलेल्या अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर दुपारी १.१५ वाजता राष्ट्रपती मुखर्जी हे त्याचठिकाणी मराठमोळ्या पध्दतीच्या भोजनाचा आस्वाद घेणार आहेत. नंतर दुपारी दोन वाजता ते विशेष हेलिकॉप्टरने पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. दुपारी २.३० ते २.५० या २०मिनिटांच्या वेळेत विठ्ठल मंदिरास भेट देऊन सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर दुपारी तीन वाजता पंढरपूर अर्बन बँकेच्या शताब्दी महोत्सव सोहळयास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नंतर ते पुण्याकडे विशेष हेलिकॉप्टरने रवाना होतील, असे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.