राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे येत्या शनिवारी २९ डिसेंबर रोजी सोलापूर व पंढरपूरच्या भेटीवर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत सोलापुरात डॉ. निर्मलकुमार फडकुले नाटय़संकुलाचे लोकार्पणतसेच अक्कलकोट रस्त्यावर कुंभारी येथे अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्याचे उद्घाटन होणार आहे. याशिवाय पंढरपुरात विठ्ठल मंदिरास भेट व विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन आणि पंढरपूर अर्बन बँकेचाच्या शताब्दी सोहळय़ात सहभाग असे विविध कार्यक्रमांसाठी राष्ट्रपती येत आहेत.
अधिकृत मिळाल्या तपशिलानुसार बीदर येथील लष्करी तळावरून विमानाने राष्ट्रपती मुखर्जी हे शनिवारी सकाळी ११.३० वाजता सोलापुरात येणार आहेत. त्यानंतर सकाळी ११.४५ वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले नाटय़गृहाचा लोकार्पण सोहळा राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. तेथून ते शासकीय वाहनाने कुंभारी येथे रवाना होतील. दुपारी १.१५ वाजता कुंभारी येथे अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर त्याच ठिकाणी राष्ट्रपती मुखर्जी हे महाराष्ट्रीयन पद्धतीचे भोजन घेणार आहेत. दुपारी २.१५ वाजता ते सोलापूरला येऊन नंतर हेलिकॉप्टरने पंढरपूरकडे प्रयाण करतील. दुपारी २.५० वाजता त्यांचे पंढरीत आगमन झाल्यानंतर प्रथम ते विठ्ठल मंदिरास भेट देऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता पंढरपूर अर्बन बँकेच्या शताब्दी महोत्सव सोहळय़ास प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची उपस्थिती राहणार आहे.
राष्ट्रपतींच्या या दौऱ्यात राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्यासह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय आरोग्य तथा कुटुंबकल्याणमंत्री गुलाम नबी आझाद आदी सहभागी होणार आहेत. सायंकाळी ४.३० वाजता राष्ट्रपती मुखर्जी हे हेलिकॉप्टरने पुण्याकडे प्रयाण करणार आहेत.