राष्ट्रपतींचा दौरा लातूरकरांनी दुसऱ्यांदा अनुभवला. पाच वर्षांपूर्वी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील लातुरात आल्या होत्या. त्यांच्या दौऱ्याच्या वेळी तैनात केलेल्या सुरक्षा यंत्रणेची तुलना लातूरकर सुरक्षेला अवास्तव महत्त्व दिलेल्या आताच्या दौऱ्याशी करीत आहेत.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या दौऱ्याची चर्चा दोन महिन्यांपासून होती. गेल्या आठवडाभरापासून सुरक्षा यंत्रणेने सर्वच यंत्रणांना हलवून टाकले. एरवी मोठय़ा शहरात राष्ट्रपतींचा दौरा होत असतो, तेव्हा सामान्य जनतेला फार त्रास होणार नाही, याची काळजी आवर्जून घेतली जाते. परंतु लातुरात त्यांच्या सुरक्षेला अवास्तव महत्त्व देण्यात आले. त्याचा मनस्ताप सामान्यांना सहन करावा लागला. या अतिरेकी सुरक्षेचे कारण काय? हे मात्र कोणीही सांगू शकले नाही.
दोन दिवस औसा रस्ता व बार्शी रस्ता रहदारीसाठी बंद केला होता. या रस्त्यावरील दुकाने उघडू नयेत, अशी सक्त ताकीद त्यांना होती. ‘दयानंद’च्या कार्यक्रमस्थळी मोबाईल, पिशवी आणण्यास मज्जाव होता. मोबाईल जॅमर लावले असते तर यातून मार्ग काढता आला असता. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पासेस देण्याच्या यंत्रणेने प्रचंड त्रास दिला. जिल्हा शल्यचिकित्सकासह अनेक प्रथमवर्ग दर्जाच्या शासकीय अधिकाऱ्यांना तासन्तास पास मिळवण्यास पोलिसांसमोर खेटे घालावे लागत होते. पोलीस अधिकाऱ्यांचे वर्तनही अतिशय उर्मट होते. सर्वच स्तरातील लोकांना पास मिळण्यासाठी प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या. त्यातून वृत्तपत्र छायाचित्रकारही सुटले नाहीत.
राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी मोठय़ा शहराला एक व छोटय़ा शहराला दुसरा न्याय हा भेदभाव का? याचा खुलासा करण्याची गरज आहे, असे मत अनेकजण व्यक्त करीत होते. औसा रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृहावर पाच वर्षांपूर्वी राष्ट्रपतींसाठी स्वतंत्र कक्ष आरक्षित होता. या कक्षाची नव्याने दुरुस्ती करण्यात आली. संपूर्ण कक्ष वातानुकूलित केला होता. राष्ट्रपती ज्या कक्षात थांबणार होते, त्यातील स्वच्छतागृहालाही वातानुकूलित यंत्रणा बसविली होती. एकूणच राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी थोडा अतिरेकी ताणच यंत्रणेने घेतला व सामान्यांना त्याचा नाहक त्रास झाल्याची चर्चा लातुरात आहे.