जोपर्यंत नागपूरकर एखाद्या विषयात हात घालत नाही तोपर्यंत तो विषय धसास लागत नाही, असा आजवरचा इतिहास ओळखून इंदू मिलच्या साडेबारा एकर जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक निर्माण करण्यासंबंधीचे आंदोलन आजपासून छेडण्यात आले आहे. आज अनेक आंबेडकरी संघटनांनी एकत्र येऊन संविधान चौकात एक दिवसांचे सांकेतिक धरणे दिले.
नागपुरातील विविध आंबेडकरी संघटनांनी स्मारकाच्या जागेच्या हस्तांतरणासाठी आंदोलनाचे बिगुल फुंकले. त्यात महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम, मुक्तवाहिनी, रिपब्लिकन पँथर, रिपब्लिकन मुव्हमेंट, उत्तर नागपूर विकास परिषद, पिपल्स डेमॉक्रेटिक मुव्हमेंट, भाजप अनुसूचित जाती मोर्चा, धम्मसेना, परिनिर्वाण भूमी आंदोलन, डॉ. आंबेडकर सोशल फोरम, भारतीय दलित पँथर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियााचे आठवले आणि गवई गट, आदिम संरक्षण समिती, नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघटना, सिंधी पंचायत समिती, भारत-तिबेट सहयोगी मंच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार संघ आणि रिपब्लिकन पँथर आदी संघटनांनी एकत्र येऊन संविधान चौकात नारेबाजी केली.
मुंबईतील वरील स्मारकासाठी गेल्या पाच-सहा वर्षांपासून सकारात्मक विचार-विनिमय सुरू आहे. इंदू मिलची जागा केंद्र शासनाच्या अखत्यारित असल्याने ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीसाठी द्यावी, अशा प्रकारचा पत्रव्यवहारही महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे केला आहे. केंद्र शासनाने त्याबाबत अनुकुलता दर्शवली आहे. याबाबत निश्चित भूमिका घेऊन ६ डिसेंबरला बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनी स्पष्ट घोषणा करावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे. त्या स्मारकाच्या जागेबद्दल महाराष्ट्रात उलटसुलट चर्चा असून असामाजिक तत्त्वांनी त्याचा गैरफायदा घेवू नये त्याबाबतची भूमिका शासनाने जाहीर करावी आणि इंदू मिलच्या जागेबाबत केंद्र शासनाने कुठली कार्यवाही केली याबाबत विशेष भूमिका घेऊन त्याला केंद्र सरकारची मान्यत मिळवण्यात पुढाकार घ्यावा आणि स्मारकाचा प्रश्न शक्य सोडवावा, असे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाला पाठवले आहे.