शेवगावला नगरपालिका स्थापन करावी या मागणीसाठी नगरमध्ये उपोषण सुरू असतानाच पाठोपाठ कर्जत व नेवासे येथेही पालिका स्थापन करावी, या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. कर्जतमधील राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व ग्रामपंचायतीच्या कर्मचा-यांनी शुक्रवारपासून नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, तर नेवासे तहसील कार्यालयासमोर मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारपासून उपोषण सुरू केले आहे.
काही दिवसांपूर्वी जामखेड ग्रामपंचायत बरखास्त करून राज्य सरकारने तेथे नगरपालिका स्थापन केली. त्याच वेळी नेवासे, कर्जत, शेवगाव येथेही पालिका स्थापन करण्याचा प्रस्ताव होता, परंतु केवळ जामखेडला मान्यता मिळाली, त्यामुळे आंदोलनाचा भडका उडाला. दरम्यान, गुरुवारीच पालकमंत्री मधुकर पिचड यांनी शेवगावच्या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे राज्यातील आणखी काही ठिकाणी पालिका स्थापन करण्याचे प्रस्ताव सादर असल्याची माहिती दिली होती.
शेवगावसाठी आम आदमी पार्टी व ग्रामपंचायत कर्मचा-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या आंदोलनाचा शुक्रवारी सहावा दिवस आहे. त्यांच्याच शेजारी कर्जतच्या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. अशोक खेडकर, प्रसाद ढोकरीकर, प्रणेश शहा, अजिनाथ कचरे, अशोक मोहोळकर या भाजप पदाधिका-यांसह ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिका-यांनाही निवेदन देण्यात आले.
नेवासे येथे पालिका स्थापन करावी या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर मराठा सेवा संघाचे गणेश जाधव यांनी गुरुवारपासून उपोषण सुरू केले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे, जि.प. सदस्य दिलीप वाकचौरे, पंचायत समिती सदस्य जानकीराम डौले आदींनी उपोषणास पाठिंबा दिला.