प्रात्याक्षिक परीक्षेचे गुण देण्याऐवजी विद्यापीठाचे गुण दिल्याने गोंडवाना विद्यापीठावर पाच अभियांत्रिकी महाविद्यालयांचा प्रथम वर्षांचा जाहीर झालेला निकाल मागे घेण्याची नामुष्की ओढवली. गोंडवाना विद्यापीठाच्या या भोंगळ कारभारामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.
 गोंडवाना विद्यापीठांतर्गत राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालय, नामदेवराव पोरेड्डीवार व बल्लारपूर इंस्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या पाच महाविद्यालयांचा समावेश आहे. गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या या पाच अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षांच्या हिवाळी सत्राची परीक्षा नुकतीच झाली. गोंडवाना विद्यापीठाने त्यांचा निकाल १९ जानेवारीला सकाळी ११ वाजता ऑनलाईन जाहीर केला. अभियांत्रिकी प्रथम वष्रे परीक्षेत ८० गुण लेखी परीक्षा व २० गुण महाविद्यालयाचे, तर २५ गुण प्रात्याक्षिक परीक्षा व २५ गुण विद्यापीठाचे असतात, मात्र गोंडवाना विद्यापीठाने गुणपत्रिका तयार कतांना प्रात्याक्षिकाच्या गुणांऐवजी विद्यापीठाचे गुण व विद्यापीठाच्या गुणांऐवजी प्रात्याक्षिकाचे गुण दिले. ऑनलाईन निकाल जाहीर होताच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात ही गंभीर बाब आली. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाची ही चूक महाविद्यालयाच्या प्राचार्याना निदर्शनास आणून दिली. त्यानंतर प्राचार्यानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय आईंचवार, परीक्षा प्रमुख, उपकुलसचिव इरपाते यांच्या निदर्शनास ही चूक आणून दिली. त्यानंतर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनीही ऑनलाईन निकाल तपासल्यावर ही घोडचूक झाल्याचे निदर्शनास आले.
विद्यापीठाने या गंभीर चुकीची तातडीने दखल घेऊन अवघ्या काही तासात हा निकाल मागे घेतला. विद्यापीठाने सकाळी जाहीर केलेला निकाल सायंकाळी मागे घेतल्यानंतर ही घोडचूक कुणाकडून झाली, याची चौकशी आता सुरू करण्यात आलेली आहे. दरम्यान, गोंडवाना विद्यापीठाला सुरुवात झाल्यापासून ते काही ना काही कारणांनी वादग्रस्त ठरत आहे. यावेळी तर अभियांत्रिकीच्या निकालाबाबत घोडचूक झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दरम्यान, विद्यापीठाकडून झालेल्या चुकीची दुरुस्ती करून उद्या सायंकाळपर्यंत किंवा परवा सकाळी हा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
केवळ अभियांत्रिकीच नाही तर एम.ए. मराठीचा निकाल जाहीर केला तेव्हाही अशाच प्रकारची नामुष्की विद्यापीठावर ओढवली होती, मात्र तेव्हा ही गंभीर बाब कुणाच्या निदर्शनास आली नाही. यावेळी तर अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनीच ही बाब विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिली. गोंडवाना विद्यापीठाच्या अशा गोंधळाच्या कार्यप्रणालीमुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. केवळ हेच नाही तर विद्यापीठाने बीबीएचे पेपर वाणिज्य शाखेच्या प्राध्यापकांकडून तपासल्याने या शाखेचा निकाल अतिशय कमी लागलेला आहे. हीच परिस्थिती विद्यापीठाच्या इतरही शाखांची आहे. त्याचबरोबर इतर विद्याशाखांचे निकाल जाहीर करतांना बराच घोळ झाल्याचे निदर्शनास आलेले आहे.