ऐन पावसाळ्यात मुंबई महापालिकेकडील ‘एमएल ऑईल’ आणि ‘ग्रॅन्युला पावडर’चा साठा संपत आला आहे. परिणामी मलेरिया निर्मूलनाच्या मोहिमेसह साथीच्या आजारांना आळा घालण्याच्या कामाला खीळ बसण्याची भीती आहे.
पावसाळ्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये, डासांच्या उत्पत्तीला आळा बसावा यासाठी ठिकठिकाणी साचणाऱ्या पाण्यावर एमएल ऑईलची फवारणी केली जाते. मध्यंतरी एमएल ऑईलचा साठा अपुरा पडू लागल्यामुळे गॅ्रन्युला पावडरचा वापर करण्यात येत होता. परंतु आता या दोन्ही औषधांचा साठा संपत आला आहे. तसेच डासांच्या अळ्या होऊ नयेत यासाठी पाण्याच्या पिंपात टाकण्यात येणारे अ‍ॅबेट औषधही संपत आल्याचे समजते.
महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीमध्ये मलेरिया निर्मूलन चौक्या असून विभागातील मलेरिया निर्मूलनासाठी या चौक्यांमध्ये कीटकनाशक आणि औषधांचा साठा केला जातो. परंतु २४ पैकी तब्बल १७ कार्यालयांतील एमएल ऑईलचा साठा संपुष्टात आला आहे. सहा विभागांमध्ये केवळ दोन-तीन दिवस पुरेल इतकेच एमएल ऑईल उपलब्ध आहे. त्यामुळे मलेरिया निर्मूलनाची मोहीम धोक्यात येण्याची शक्यात वर्तविण्यात येत आहे. पालिकेने ८९ लाख लिटर एमएल ऑईल खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ही फाईल उपप्रमुख लेखापाल (भारत लोकसंख्या प्रकल्प – ५) यांच्या टेबलवर धूळ खात पडली आहे. ही फाईल वेळीच हातावेगळी करण्यात आली असती तर हे ऑइल पालिकेकडे आले असते. काही महिन्यांपूर्वी महापालिकेकडे असलेले अ‍ॅबेट औषधाचा साठा संपुष्टात आला होता. त्यावेळी आरसीएफ, रिलायन्स, टाटा यांसारख्या काही मोठय़ा कंपन्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून अ‍ॅबेट उपलब्ध केल्यामुळे पालिकेला वेळ मारून नेता आली होती.