महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदावर निवड होण्यासाठी पूर्वी घोडेबाजार होत असे, हे ‘गुपित’ उघड करतानाच, आपण मात्र असे काही न करता या पदावर निवडून आलो आहोत, असे भाजपचे नवनियुक्त स्थायी समिती सभापती नारायण कुचे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. मचे यांच्या टिप्पणीवर मनपाच्या राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा रंगली.
दरम्यान, या प्रतिक्रियेवर पत्रकारांनी ‘तुम्ही मात्र नगरसेवकांना सहलीवर कसे काय घेऊन गेलात,’ अशी विचारणा केली असता ‘एवढा खर्च तर करावाच लागतो’ अशी मल्लिनाथीही कुचे यांनी या संदर्भात केली. महापालिकेच्या स्थायीसह विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत शनिवारी पार पडली. नगर सचिव ओ. सी. सिरसाठ, उपजिल्हाधिकारी हदगल यांनी त्यांना सहकार्य केले. खासदार चंद्रकांत खैरे व रावसाहेब दानवे, महापौर कला ओझा, आमदार प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी व संजय शिरसाट, आघाडीचे गटनेते गजानन बारवाल, सभागृह नेता सुशील खेडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यासह शिवसेना-भाजपचे सदस्य उपस्थित होते.
अन्य समित्यांचे सभापती – महिला व बालकल्याण – प्राजक्ता भाले (शिवसेना, सभापती) व कमल नरोटे (भाजप, उपसभापती), वैद्यकीय साह्य़ व आरोग्य – मनीष दहिहंडे (शिवसेना), शहर सुधार – दिग्विजय शेरखाने (शिवसेना), पूर्वमाध्यमिक, माध्यमिक व तांत्रिक शाळा – महेश माळवदकर (भाजप), गलिच्छवस्ती निर्मूलन, घर बांधणी व समाजकल्याण – बन्सी जाधव (शिवसेना). यातील नरोटे, शेरखाने व माळवदकर या तिघांची बिनविरोध निवड झाली.