शुद्धिकरणानंतर घरोघरी पोहोचणारे पालिकेचे पाणी वाटेत दूषित होत असल्यामुळे मुंबईकरांना खासगी कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. एकीकडे अक्षरश: नगण्य किंमतीत घरोघरी पाणी पोहोचविणाऱ्या महापालिकेच्या नावाने सामान्य नागरिक शंख करीत आहेत. त्याच वेळी अनेकपट जास्त पैसे मोजून खासगी कंपन्यांची धन करीत आहेत. गिरगाव, कुलाबा, भेंडीबाजार, काळबादेवी या दक्षिण मुंबई परिसरात अनेक कुटुंबांना या ‘शुद्ध’ पाण्यापोटी दर महिना हजार ते दीड हजार रुपये मोजावे लागत आहेत.
दक्षिण मुंबईतील दाटीवाटीच्या इमारतींच्या मधील घरगल्ल्या दूषित पाणीपुरवठय़ास कारणीभूत असल्याची ओरड अधिकारी आणि राजकारणी नेहमीच करतात. मात्र काही दिवसांपूर्वी मालाड येथे कूपनलिका खोदताना जलबोगद्याला छिद्र पडले आणि पश्चिम उपनगरवासीयांच्या दारीही दूषित पाणी पोहोचले. पूर्व उपनगरांमध्येही दूषित पाणीपुरवठय़ाने नागरिक हैराण झाले आहेत. झोपडपट्टय़ांमध्ये फोडण्यात येणाऱ्या जलवाहिन्यांमुळे पाणी अशुद्ध होत असल्याचीही ओरड पालिका करीत असते. मात्र अशा पाणी माफियांविरुद्ध कारवाई करण्याची राजकीय आणि प्रशासकीय पालिकेच्या आयुक्तांनी आजवर दाखविलेली नाही. मतांवर डोळा ठेवणाऱ्या राजकारण्यांकडून तर अशी अपेक्षा करणेही व्यर्थच आहे.
१९९५ पूर्वीच्या झोपडपट्टय़ा आणि निवासी इमारतींना अनुक्रमे प्रतिहजार ३ रुपये २४ पैसे आणि ४ रुपये ३२ पैसे अशा किरकोळ दराने महापालिका पाणीपुरवठा करते. इतक्या स्वस्तात मुंबईकरांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शुद्ध पाणी पुरविले जात असल्याची प्रसिद्धी नेहमी केली जाते. मात्र अनेकदा होणाऱ्या दूषित पाणीपुरवठय़ाबाबत मात्र सगळ्यांचीच आळीमिळी गुपचिळी असते. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम उपनगरांमध्ये अनेक भागांत नळाला पिवळे पाणी येत आहे. त्यामुळे या परिसरातही बाटलीबंद पाण्याच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे.अनेकांनी घरी २० लिटरचा बाटला घेतला आहे. साधारण चार जणांच्या कुटुंबाला २० लिटर पाणी दोन दिवस पुरते. त्यामुळे दर आठवडय़ाला २० लिटरचे सुमारे तीन ते चार बाटले खरेदी करावे लागतात. २० लिटर पाण्याच्या बाटल्याच्या किमतीत मुंबईत एकसमानता नाही. दक्षिण मुंबईत २० लिटर पाण्यासाठी ८० ते १०० रुपये, तर उपनगरामध्ये ७० ते ७५ रुपये मोजावे लागतात. याचाच अर्थ महिन्याला किमान हजार ते दीड हजार रुपये भरुदड भरावा लागत आहे.