गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या एलबीटी विरोधी संपाची झळ सामान्य ग्राहकांबरोबरच कॅटर्स आणि लग्नसोहळ्यांना बसू लागली आहे. किरकोळ किराणा दुकानदारांकडील वस्तूंचा साठा संपत चालल्याने डाळ, तांदूळ, गहू आता दुरापास्त होण्याच्या मार्गावर आहे. मे महिना लग्नसराईचा असला तरी ठोक खरेदीसाठी कापडाची दुकानेच उपलब्ध नसल्याने एकतर दुसऱ्या जिल्ह्य़ातून किंवा पांढुर्णा येथून ठोक खरेदी करण्याची वेळ अनेक कुटुंबांवर आली आहे.
 नागपूर पाठोपाठ मुंबई आणि अमरावतीतही व्यापाऱ्यांनी मंगळवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारून व्यापाऱ्यांनी एलबीटीला विरोध केला. त्यामुळे अमरावतीतून खरेदी करणाऱ्यांना दुसऱ्या जिल्ह्य़ाकडे धाव घ्यावी लागली. मात्र, नागपूरसारखे मार्केट कुठेही नाही, त्यामुळे मनपसंत खरेदीची स्वप्ने आता भंगली आहेत. एकतर संप संपवावा लागेल किंवा मुंबई वा शेजारच्या राज्यातून खरेदी करावी लागेल, अशी परिस्थिती उद्भवली आहे.
ठोक विक्रेत्यांनी मालाची विक्री बंद ठेवल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या असून यात कॅटर्स सर्वाधिक पोळले जात आहेत. उन्हाच्या काहिलीत लग्नसमारंभाचे बार उडविणाऱ्यांना आता हातचे राखून मेन्यू ठरविण्याची वेळ आली आहे. लग्नाचा हॉल, कॅटरिंग, बँड यांचे बुकिंग अग्रीम झालेले आहे. परंतु, ऐन लग्नाच्या वेळी मेजवानीसाठी लागणाऱ्या जीवनावश्य वस्तू खरेदी करण्यासाठी दारोदार भटकण्याची वेळ कॅटरिंगचा व्यवसाय करणाऱ्यांवर ओढवली आहे. एलबीटी विरोधी आंदोलन एवढे लांबेल, याची कल्पना नसल्याने आगाऊ खरेदी करण्यात आली नव्हती. आता मात्र, त्याचे परिणाम जाणवू लागले असून मेन्यूतील अनेक पदार्थ रद्द करण्यासाठी विनंती केली जात आहे.
मेजवानीसाठी उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील विवाह समारंभात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, पनीर, ताक, क्रीम, लस्सी, आईस गोला, चीज यांचा वापर करून तयार झालेल्या पदार्थाचा आस्वाद वऱ्हाडी घेतात. परंतु, किरकोळ बाजारात उपलब्ध असलेले चीज, क्रीम आता संपत चालल्याने पर्यायी मेन्यू तयार केला जात आहे. गहू, तांदूळ, डाळ, मसाले यांचीही खरेदीही महागल्याने कॅटर्सनी दर वाढविले आहेत.
ठोक बाजारातून मालाची खरेदी आणि किरकोळ दुकानातून खरेदी यात मोठी आर्थिक तफावत आहे. ज्या कॅटर्सकडे आगाऊ माल नाही, त्याची धावपळ होत असून स्वस्तात स्वत माल देणाऱ्या दुकानांचा शोध घेऊन खरेदी केली जात
आहे.
लग्नघरांची प्रचंड धावपळ
ठोक बाजारपेठा बंद असल्याने सर्वाधिक अडचण लग्नघरांची झाली आहे. वधूपक्षाला व्यापाऱ्यांच्या बंदचा सर्वात जबर तडाखा बसला आहे. अनेकांची खरेदी पुढे ढकलावी लागली आहे किंवा मिळेल त्या दुकानातून बस्ते, दागदागिन्यांची खरेदी करून वेळ निभावून नेली जात आहे. नागपुरातील इतवारी, महाल, गांधीबाग, गोकुळपेठ परिसर साडय़ांचे माहेरघर समजले जाते. उन्हाळ्यातील लग्नसमारंभासाठी या परिसरातील दुकानांमधून मोठय़ा प्रमाणात ठोक खरेदी केली जाते. पाय ठेवायलाही जागा नाही, अशी आणीबाणीची परिस्थिती उद्भवणाऱ्या दुकानांना टाळे लागले असून लग्नाचे टेंशन असलेली कुटुंबे आता साडय़ांच्या ठोक खरेदीसाठी किरकोळ साडी दुकानांकडे वळू लागली आहे. लग्नाच्या सीझनमध्ये मोठय़ा प्रमाणात विक्री करून नफा कमावणारा एक व्यापारी वर्गदेखील या घडामोडींमुळे अस्वस्थ आहे. परंतु, व्यापारी संघटनेचा आदेश असल्याने दुकाने बंद ठेवणे भाग आहे. नववधू-वराच्या शालू-सुटबुटाच्या खरेदीसाठीही लग्नघरांमध्ये ओळखीच्या व्यापाऱ्यांचा शोध घेणे सुरू झाले आहे.