शहरातील ऐतिहासिक नहर-ए-अंबरीची लांबी सुमारे ४.४२ किलोमीटर असून त्यावर ७५ मेनहोल आढळून आले आहेत. नहरीच्या उगम स्थानापासून ते सर्व मेनहोलमध्ये आजमितीस पाणी नाही. तसेच नहरीची खोली बहुसंख्य ठिकाणी एकसारखी नाही. तसेच दोन मेनहोलमधील अंतरही अधिक आहे. त्यामुळे आजमितीस अंतर्गत सव्‍‌र्हेक्षण करणे शक्य नाही, अशा आशयाचा अहवाल बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर करण्यात आला. परिस्थिती जाणून घेतल्यानंतर या अनुषंगाने पुढील सुनावणी ६० दिवसांनंतर ठेवण्यात आली आहे.
पाणचक्की येथील पाणी दूषित झाल्याने हौदातील मासे मृत झाल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. त्याआधारे न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल केली. नहर-ए-अंबरी व पाणचक्कीचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी न्यायालयाने महापालिकेचे अधिकारी, अभियंता, आर्किटेक्ट व राज्य सरकारच्या प्रतिनिधींची समिती गठित करून प्रत्यक्ष पाहणी करावी, असे निर्देश दिले होते. त्यानुसार नेमलेल्या आठ सदस्यीय समितीने नहर-ए-अंबरीची बाह्य स्वरूपात पाहणी केली. रोजबाग येथील गो-मुख बिंदूपासून सव्‍‌र्हेक्षणाची सुरुवात करून सावंगी व धरण व तळ्यांमधील अंतिम मेनहोलपर्यंत सव्‍‌र्हेक्षण करण्यात आले. या सव्‍‌र्हेक्षणात पाणी आढळून आले नाही. नहरीचा आकार तीन फूट व्यासाचा असल्याचे प्राथमिक सव्‍‌र्हेक्षणातून दिसून आले आहे. ऐतिहासिक नहर-ए-अंबरीचे संरक्षण व्हावे म्हणून नहर बचाव समितीचे डॉ. शेख रमजान यांची समिती गठीत करण्यात आली आहे. त्यांच्या वतीने  हा अहवाल सादर करण्यात आला.