केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये दोन रुपयाने केलेली वाढ आणि बाजारपेठेत कमी झालेली भाज्यांची आवक, यामुळे गेल्या दोन आठवडय़ापासून भाज्यांचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. किरकोळ बाजारात जवळपास सर्वच भाज्यांच्या भावांनी चाळीशी गाठली आहे. बहुतेक सर्व भाज्या महाग झाल्यामुळे घरातील बजेट विस्कळीत झाले आहे. येणाऱ्या दिवसात भाज्याचे भाव आणखी वाढण्याची चिन्हे असल्याची शक्यता भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केली.
उन्हाळ्यामध्ये भाज्यांचे भाव स्थिर असताना पावसाळा सुरू होताच पुन्हा एकदा भाज्यांचे भाव गगनाला भिडले. कधी नव्हे ते आले २८० रुपये किलो झाले आहे. पेंट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. पावसामुळे गेल्या आठ दिवसापासून भाज्यांची अवक कमी झाली आहे. प्रखर उन्हाळ्यानंतर विदर्भात पाऊस बऱ्यापैकी झाला असला तरी अजुनही तो पिकांसाठी मात्र पुरेसा नाही. त्यामुळे भाज्यांचे भाव कमी होण्याची शक्यता नाही. नागपुरात येणारा भाजीपाला जिल्ह्य़ातील आसपासच्या गावातून येत असला तरी आंध्र प्रदेश, नाशिक आणि विदर्भातील अन्य जिल्ह्य़ातून मोठय़ा प्रमाणात आवक केली जाते.
पालेभाज्यांसह बहुतेक भाज्या ४० ते ५० रुपये किलोच्यावर आहे. किरकोळ बाजारात आले २८० रुपये किलो, हिरवी मिरची ८० ते १०० रुपये किलो, कोथिंबीर ५० ते ६० रुपये किलो, टोमॅटो ४० ते ५०, पालक ४० ते ५० रुपये, भेंडी ४० ते ५०, चवळी ३५ ते ४०, शिमला मिरची ७० ते ८०, कारले ४० ते ५०, काकडी ४० ते ५०, ढेमस ४० ते ५०, गाजर ५० ते ६०, तोंडले ३० ते ४०, कोहळे २० ते २५, मेथी ४० ते ५०, आले ४० ते ४५, लसूण १२० ते १४०, भेंडी ४० ते ५०, गवार ४० ते ५०, फुलकोबी ६० ते ७०, पत्ता कोबी ४० ते ५०. वांगे २० ते २५, बटाटे २० ते २५, लौकी ३० ते ४०, परवल ४० ते ५०, दोडके ४० ते ५०, सुरई ४० ते ५०, चळवळीच्या शेंगा ४० ते ५० प्रतिकिलो विक्रीला आहे. या शिवाय, कांद्याची पात २० ते २५ रुपये, पांढरा मुळा २० रुपये जुडी असा दर सुरू आहे.
या दरवाढीचा फटका ग्राहकांबरोबरच लहान हॉटेलचालक, भेळविक्रेते व भोजनालयांनाही बसत आहे. दैनंदिन व जीवनावश्यक गोष्टीचे दर विविध कारणाने गगनाला भिडत आहेत. ही नेहमीची दरवाढ पाठ सोडायला तयार नाही, पुढे पाऊस वाढला तर भाज्यांचे नुकसान झाले म्हणून भाज्याचे दर चढेच राहतील, अशी प्रतिक्रिया बुधवार बाजारातील भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केली.