तळोजा मध्यवर्ती कारागृहात अंकुश अशोक काटकर या कैद्याने दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २५ मार्च रोजी घडली होती. मात्र खारघर पोलिसांनी विधी विभागाचा सल्ला घेऊन याबाबत रविवारी गुन्हा दाखल केला.
तळोजा कारागृहामधील बंद विहिरीवरील लोखंडी जाळी काढून काटकर त्या विहिरीत उडी मारत असताना त्याला कारागृहाच्या रक्षकाने रोखले. काटकर हा नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. न्यायालयातून पडणाऱ्या तारखांमुळे काटकर त्रस्त झाला आहे, त्यामुळे त्याने आत्महत्येचा मार्ग निवडल्याचे या प्रकरणाचे तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगीतले.
याबाबत कारागृह अधीक्षक शिवाजी आचमे यांच्याशी संपर्क साधला, परंतु तो होऊ शकला नाही.

आतापर्यंत चार जणांच्या आत्महत्या
तळोजा कारागृहात २१०० कैद्यांची क्षमता आहे. सध्या या कारागृहात १७७७ कैदी आहेत. मुंबई, ठाणे परिसरातील कारागृहातून आलेल्या कैद्यांना येथे ठेवण्यात येते. कैद्यांच्या सुरक्षेचा येथे बोजवारा उडाला आहे. असुरक्षिततेच्या दृष्टीने याच कारागृहातून अबू सालेम, अरुण गवळी यांसारख्या बडय़ा गुन्हेगारांना इतर कारागृहात हलविण्यात आले होते असे येथे सांगितले जाते. कारागृह सुरू झाल्यापासून आतापर्यंत चार कैद्यांनी आत्महत्या केल्या आहेत व काहींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यापैकी तीन आत्महत्येंची नोंद सुरुवातीच्या वर्षांमध्ये झाली तर गेल्या वर्षी एका कैद्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. २० फेब्रुवारीला रमेश वटारे याच्या आत्महत्येने येथील कारागृह प्रशासनाच्या कारभाराविषयी साशंकता निर्माण झाली आहे.
कारागृहामधील कैद्यांमधील वर्चस्वाच्या वादामुळे आपसातील टोळीयुद्ध तसेच कारागृहातील पोलिसांवर अंकुश ठेवण्यासाठी नव्या उभरत्या विकी देशमुख या कैद्याने आपल्या साथीदारांकरवी कारागृह पोलिसांवर रस्त्यावर खुलेआम गोळीबार केला होता. यामुळे अवघे पोलीस दल हादरून गेले होते. जगताप ऊर्फ जेडे या कैद्याला शस्त्रे पुरविण्यात आली होती. तीच शस्त्रे घेऊन जेडे याने बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेमवर हल्ला केला होता. या सर्व घटनाक्रमामुळे तळोजा कारागृह असुरक्षिततेकडे जात आहे. आत्महत्येचा दोनदा प्रयत्न केलेला अंकुश काटकर याचा टोळीयुद्धाशी काही संबंध नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. गुन्हेगाराचे परिवर्तन करण्यासाठी कारागृहात समुपदेशन व सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात, तरीही बंदींकडून आत्महत्या व आत्महत्येचे प्रयत्न होतात, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येते.