ऑर्थर रोड मध्यवर्ती तुरुंगात नोटांच्या तस्करीची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर तुरूंगातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. बलात्कार प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीने चपलांमधून दोन लाख रुपये दडवून नेल्याची बाब उघड झाली आहे. होते.
 २०१० साली सात मुलींवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून मेहंदी कासिम शेख उर्फ बंगाली बाबा (३९) याला अटक करण्यात आली होती. सध्या तो आर्थर रोड तुरुंगात आहे. २० एप्रिल रोजी सत्र न्यायालयातल्या सुनावणीसाठी शेखला न्यायालयात नेण्यात आले होते. पुन्हा तुरुंगात येताना तपासणीदरम्यान त्याच्या चपलांमध्ये दडवून ठेवलेले दोन लाख रुपये पोलिसांना आढळले. त्याने दोन्ही चपलांमध्ये प्रत्येकी एक लाख रुपये दडवले होते. सुरक्षा रक्षकांना त्याच्या मोठय़ा चपलांचा संशय आल्यानंतर त्याची तपासणी केली आणि हा प्रकार उघडकीस आला. वकिलाला देण्यासाठी नातेवाईकाने हे पैसे दिल्याचे त्याने कारागृहाच्या पोलिसांना सांगितले. कारागृहाने न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. दरम्यान, याप्रकारानंतर तुरुंगात येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जात असून सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आल्याची माहिती कारागृहाच्या सूत्रांनी           दिली.