पाण्याची स्थिती एवढी गंभीर बनली आहे की, औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात कैद्यांना आठवडय़ातून केवळ दोनदाच अंघोळ क रावी लागते आहे. पाण्याची काटकसर करा, असे निर्देश कारागृह निरीक्षकांनी दिले आहेत. क्षमतेपेक्षा अधिक कैदी आणि मिळणारे कमी पाणी यामुळे दिवसेंदिवस स्थिती गंभीर बनू लागली आहे. सध्या १० हजार लिटर क्षमतेच्या दोन टँकरने कारागृहाला पाणीपुरवठा होतो. कारागृहात तेराशेहून अधिक कैदी व दोनशेहून अधिक अधिकारी कारागृह परिसरात वास्तव्यास आहेत.
मराठवाडय़ातील चार जिल्ह्य़ांमध्ये पाण्याची पातळी खोल गेली आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ात ती सरासरी १२.८३ मीटरने खाली गेली आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी ही समस्या जिल्ह्य़ात सर्वत्र आहे. शहरातही आठवडय़ात दोनदाच पाणीपुरवठा होतो. शहरातील हर्सूल कारागृहात तीन ऐतिहासिक विहिरी आहेत. पिण्यासाठी मात्र तीन दिवसांतून एकदा पाणी येते, ते तासभरच असते. कारागृहातील कैद्यांची संख्या लक्षात घेता ते पुरत नाही. त्यामुळे टँकरने पाणी घ्यावे लागते. महापालिकेने आणखी दोन टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कैद्यांनीही आता परिस्थितीशी जुळवून घेतले आहे. पिण्यासच पाणी नाही, त्यामुळे आठवडय़ातून दोनदा अंघोळ हा पर्यायही योग्य असल्याचे एका कैद्याने सांगितले.
मराठवाडय़ातील चार जिल्ह्य़ांमध्ये विविध संस्थांना अशाच प्रकारची अडचण जाणवत आहे. विशेषत: समाजकल्याणचे वसतिगृह व  महिला बालकल्याण वसतिगृहांमध्ये पाण्याची मोठी अडचण जाणवत आहे. कारागृहाशी संबंधित वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिवसेंदिवस स्थिती गंभीर होत चालली आहे. कारागृहातील शेतीची कामे बंद आहेत, त्याचा मोठा आर्थिक फटका जाणवू लागला आहे.