औरंगाबाद-नगर रस्त्यावरील देहगाव बंगल्याजवळ खासगी ट्रॅव्हल्सची बस उलटून झालेल्या अपघातात एक प्रवासी ठार, तर १८ जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास हा अपघात झाला.
बस (एमएच ३४ ए ८३७२) पुण्याहून यवतमाळकडे चालली होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या रत्नाबाई नारायण पहुरे (वय ६०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिसांना माहिती मिळण्यास विलंब झाल्याने जखमींना उपचारासाठी लवकर आणता आले नाही. अपघातातील सर्वजण यवतमाळ जिल्ह्य़ातील आहेत. वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.