पाणीटंचाईचे कारण देत लातूर शहरातील सर्व बांधकामे स्थगित करण्यात आली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून हा आदेश काढल्याचे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जाहीर केले.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात रजिस्ट्री (निबंधक) कार्यालयाशेजारी कॉलम बीमचे बांधकाम मात्र सुरू आहे. परंतु त्यांच्यावर महापालिकेने कोणतीच कारवाई केली नाही. गुरुवारी सायंकाळी या कामावर मजूर काम करीत होते. महापालिकेचा खासगी मंडळींसाठी एक न्याय व शासकीय मंडळींसाठी वेगळा न्याय का? असा सवाल विचारला जात आहे.
शहराला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्यामुळे खासगी व शासकीय बांधकाम थांबवण्याचे आदेश काढले आहेत. नव्या बांधकामांना परवानगी दिली जाणार नाही व चालू बांधकामेही त्वरित थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशांतर्गत शहरातील राजीव गांधी चौकात विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी मंजिरी विजयकुमार बारोळे यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.