News Flash

दिंडोरी तालुक्यास खासगी सावकारांचा ‘पाश’

तातडीने आणि गरजेच्या वेळेस मिळत असल्यामुळे खासगी सावकारांकडून कर्ज घेण्याकडे गरजूंचा कल असला तरी घेताना सोपे वाटणारे कर्ज फेडताना नाकीनऊ येत असते.

| November 22, 2013 08:41 am

तातडीने आणि गरजेच्या वेळेस मिळत असल्यामुळे खासगी सावकारांकडून कर्ज घेण्याकडे गरजूंचा कल असला तरी घेताना सोपे वाटणारे कर्ज फेडताना नाकीनऊ येत असते. वेळीच कर्जफेड न केल्यास वसुलीसाठी खासगी सावकारांकडून धाकदपटशहा, मारहाण, घरातील वस्तू उचलून नेणे यांसह अन्य प्रकाराचा अवलंब करण्यात येत असून अशा अशा सावकारांची चामडी सोलून काढण्याची भाषा करणारे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील हे दिंडोरी तालुक्यातील कर्जधारकांना न्याय देतील का, असा सवाल करण्यात येत आहे.
दिंडोरी, वणीसह परिसरातील लहान-मोठय़ा गावांमध्ये सावकारी व्यवसाय सुखाने सुरू असून शासकीय यंत्रणा मात्र डोळेझाक करीत आहे. यंत्रणेतील काही जणांचे खासगी सावकारांशी हितसंबंध असल्याने पद्धतशीरपणे दुर्लक्षाची भूमिका घेताना ते दिसतात. कर्जाच्या ओझ्याने दबलेल्या अनेकांना सावकारांच्या जाचामुळे पिढय़ान्पिढय़ांपासून असलेले गाव सोडून इतरत्र आसरा घ्यावा लागला आहे. दोनपासून १० टक्क्यांपर्यंत शेकडा व्याजाची आकारणी त्यांच्याकडून केली जाते. विश्वासावर हा व्यवसाय असल्याने वसुली करीता आडदांड युवकांचा भरणा असलेले टोळके घरापर्यंत येतात.
संबंधित व्यक्ती न भेटल्यास घरातील महिलांना अर्वाच्च व असभ्य भाषेत दमदाटी केली जाते. दमदाटीने देखील वसुली न झाल्यास कर्जदाराची एखादी वस्तु घेऊन जाणे, मारहाण करणे असे प्रकार वारंवार घडतात. जिवाच्या भीतीने पोलिसात तक्रार देखील करण्याची हिम्मत कर्जदार करत नसल्याने खासगी सावकारांचे फावते. वारंवार होणाऱ्या जासाला कंटाळून काही व्यक्तींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. अनेक वेळा कर्जस्वरुपात घेतलेल्या रकमेसाठी तारण म्हणून ठेवलेल्या वस्तु देखील सावकारांकडून कर्जदारांना मिळत नाहीत.
नाशिकमधील काही नामचीन गुंडांच्या आसऱ्यानेच हा व्यवसाय केला जात असून बहुतांश युवकांचा भरणा असलेल्या या वसुली व्यवसायाने हळूहळू ग्रामीण भागातील छोटय़ा-मोठय़ा खेडय़ांपर्यंत पाय पसरविले आहेत. यातून मोठे घबाड मिळत असल्याने कमी श्रमात जास्त पैसा मिळविण्याचा एक जवळचा मार्ग म्हणून युवा पिढी याकडे सहज आकर्षित होत असून यातून कायदा व सुव्यवस्थेलाही आव्हान मिळू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.
खासगी सावकारांकडून घेतलेले कर्ज व्याजासह पाचपट भरण्याची वेळ येत असल्याने सावकारांच्या दहशतीने अनेकांना स्थलांतर करावे लागले असल्याचे सांगितले जाते. खासगी सावकारांच्या मुजोरीने सर्वसामान्य व्यक्ती हतबल झाली असताना काही व्यक्तींचे यंत्रणेशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध सर्व परिचीत असल्याने सावकारी व्यवसाय करणारे तसे निर्धास्त असतात. कर्जदारांच्या वस्तू ओरबडण्याचा हा सावकारी व्यवसाय बंद करण्याची मागणी होत असली तरी पुढाकार घेण्यास कोणी तयार नाही.
खासगी सावकारांची प्रचंड दहशत असल्याने पोलीस यंत्रणेनेच स्वत: पुढे येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखा अथवा तत्सम यंत्रणेमार्फत यात अडकलेल्या कर्जदारांना दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे झाले आहे.
खासगी सावकारी व्यवसायात महिलादेखील मागे नाहीत. दिंडोरी, वणी ही व्यापारी गावे असल्याने नागरी बँकांसह अन्य संस्थांचे देखील येथील व्यावसायिकांशी अर्थकारणाचे नाते जुळलेले आहे. परंतु यातील काही घटकांना गरजेच्या वेळेस तातडीने कर्ज मिळावे याकरिता खासगी सावकारांकडे धाव घ्यावी लागते. बँकांमध्ये वार्षिक व्याजाने मिळणारे कर्ज सावकारांकडे महिन्याला शेकडय़ाने भरावे लागते.
 कर्जाच्या रकमेचे हप्ते भरून देखील रक्कम तशीच राहात असल्याने सावकारांकडून आपण  नेमके किती कर्ज घेतले याचा उलगडा कर्जदाराला होत नाही.
शेतकरी, मजूर, लहान व्यापारी, दुकानदार हे मुख्यत्वे सावकारांच्या जाळ्यात अडकतात. आता काही व्यावसायिकांनी देखील या सावकारांकडे पैसे गुंतवणूक करून सावकारी धंद्यात बस्तान बसविण्याचे प्रयत्न सुरू केले असून यावर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास दिंडोरी तालुक्यात वेगळीच समस्या निर्माण होऊ शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 8:41 am

Web Title: private obligee in dindori distrect
Next Stories
1 अवैध वाळू उत्खनन: महसूल यंत्रणाही संशयाच्या फेऱ्यात
2 गिरणा धरणाच्या दरवाजांना चढणार नवीन साज
3 ‘एमआयएम’ व समाजवादी पक्षाच्या प्रवेशाने काँग्रेस-राष्ट्रवादी अडचणीत
Just Now!
X