वंचित, दुर्बल व विशेष गरजाधिष्ठित घटकांसाठी सर्व मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के जागांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे.  २१ फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक शाळेने ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. त्यांनतर २३ फेबुवारी ते ७ मार्चपर्यंत पालकआपले प्रवेश अर्ज ऑनलाइन दाखल करू शकतात.
सर्वाना समान शिक्षणाचा आधिकार मिळावा म्हणून २५ टक्के जागा राखीव ठेवण्याच्या शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची एक कार्यशाळा बुधवारी कोपरखरणे येथील सेंट मेरी शाळेत झाली. या कार्यशाळेत ११६ शाळांच्या मुख्याध्यापकांनी  सहभाग घेतला होता. यासाठी अनुसूचित जाती-जमाती, दुर्बल घटक, अपंग यांना अर्ज करता येणार आहे. शिवाय या प्रवेशासाठी वंचित गटांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्व जाती-धर्मातील विकलांग बालके तसेच दुर्बल घटकांतर्गत कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत व धार्मिक अल्पसंख्याकदेखील पात्र असतील. अर्ज करताना पुरावा म्हणून जातीचा दाखला, जन्म प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, अपंगत्वाचा दाखला सादर करावा लागणार आहे. त्यामुळे अर्ज करताना पालकांनी या सर्व कागदपत्रांची तयारी ठेवावी असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी उपायुक्त अमरीश पटनिगिरे, केंद्र समन्वयक सावंत, हन्नुरकर आदी अधिकारी उपस्थित होते.
 प्रवेशाबाबात काही गोंधळ होऊ नये, पालकांनाही हे अर्ज कसे भरावेत यांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून प्रत्येक शाळेत एका व्यक्तीची मदतनीस म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. ती व्यक्ती याबाबत संपूर्ण माहिती देणार असून शाळेच्या नामफलकावर याबाबतची संपूर्ण माहिती प्रसारित केली जाणार आहे. तशा सूचना मुख्यध्यापकांना बैठकीत देण्यात आल्या. त्यातही विशेष म्हणजे जर एखाद्या शाळेत २५ जागा असल्या आणि अर्ज मात्र त्यापेक्षा अधिक आले तर त्या अर्जासाठी लॉटरी पद्धतीचा अवलंब करण्यात येऊन प्रवेश दिले जातील, ही लॉटरी १० किंवा ११ मार्च रोजी काढण्यात येईल. या बठकीत पालिका उपआयुक्त शिक्षण विभाग अमरीश पटनिगिरे यांनी विविध शाळांतील मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले. पालक-शिक्षक समितीने निश्चित केलेल्या शुल्काऐवजी जास्त आकारणी केल्यास मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे मुखध्याकपकांनी संस्थेचे न ऐकता नियमांचे पालन करावे असे मुख्याध्यापकांना सूचित केले.
मदत केंद्र
नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या वतीने केंद्र स्तरावर ११ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. पालकांनी याबाबतच्या अधिक माहितीसाठी ज्या शाळेत प्रवेश घ्यावयाचा आहे, त्या शाळेमध्ये अथवा मदत केंद्रावर संपर्क साधवयाचा आहे. किंवा २७५४६८८७ , २७५५०४३६६ या कार्यलयीन क्रमांकावर अथवा ९८९२८१२१९२, ९९६७८३६१९१ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधवा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे.