जिल्ह्य़ातील खासगी शाळांमधून उपलब्ध असलेल्या भौतिक सुविधांबाबत स्वप्रतिज्ञापत्र शुक्रवापर्यंत (दि. २५) सादर करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने जिल्ह्य़ातील खासगी शाळांना दिल्या आहेत.
जिल्ह्य़ात सन २००८-०९ पूर्वी ५३ इंग्रजी प्राथमिक शाळांना मान्यता मिळाली. यासह सुमारे १०९ खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांना शाळेत भौतिक सुविधा म्हणजे पिण्याचे पाणी, क्रीडांगण, शाळा खोल्या याविषयी स्वप्रतिज्ञापत्र २५ जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश आहेत. मुख्याध्यापकांना दिलेल्या आदेशात बालकांना मोफत, सक्तीच्या शिक्षण अधिनियमाच्या तरतुदीनुसार शाळामान्यता प्रमाणपत्राशिवाय शाळा सुरू राहिल्यास एक लाख रुपये दंड, तसेच त्यानंतरही शाळा सुरू ठेवल्यास १० हजार रुपये दंड आकारला जाईल. शाळेबाबतचे विवरणपत्र दोन प्रतींमध्ये भरून दि. २३ जानेवारीला येथील शासकीय अध्यापक विद्यालयात होणाऱ्या बैठकीला हजर राहण्याचे कळविले आहे.
स्वप्रतिज्ञापत्र सादर करण्याची मुदत २५ जानेवारीपर्यंत आहे. जि.प. शिक्षण विभागातर्फे शाळांची भौतिक सुविधेबाबत पडताळणी करून त्यातील त्रुटी ३१ मार्चपर्यंत दूर न झाल्यास शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण संस्थाचालकांकडे पाठविला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
हिंगोलीतील मान्यता मिळालेल्या इंग्रजी प्राथमिक शाळांमध्ये २००८-०९ पर्यंत सुमारे २० शाळांचा सामावेश आहे. २००८-०९ नंतर सुमारे ३३ शाळांचा समावेश आहे. यात हिंगोली तालुक्यात सर्वाधिक सुमारे २२ शाळांचा समावेश आहे.