नागपूरहून छत्तीसगडला वेगात जाणारी खासगी प्रवासी बस कोराडीजवळ उलटून झालेल्या अपघातात दोन महिला ठार तर ६ जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. जखमींना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी काहींना उपचारानंतर सुटी देण्यात आली. दोन्ही मृत महिला नागपूरच्या असून शैलजा अनिल कापसे आणि रामप्यारी रमेशकुमार आचार्य अशी त्यांची नावे आहेत.
ही बस छिंदवाडामधील मिगलानी ट्रव्हल्सची असून आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास २० प्रवासी घेऊन नागपूरवरून रवाना झाली. साडेअकरा वाजताच्या सुमारास कोराडी वीज केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ दोन सायकलस्वार बसच्या समोर आल्याने गोंधळलेल्या बसचालकाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता बस रस्त्याच्याकडेला नेली. बस वेगात असल्याने  वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली. त्यातील आठ प्रवासी जखमी झाले असून दोन महिला बसच्या बाहेर फेकल्या गेल्या. जबर मार लागल्याने त्यांनी अपघातस्थळी जगाचा निरोप घेतला. अपघात होताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. बसमध्ये असलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी परिसरातील लोकांनी प्रयत्न केले. दरम्यान, कोराडी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. जखमी झालेल्या प्रवाशांना बसमधून बाहेर काढताच त्यांनी सुटकेचा श्वास घेतला. या बसमध्ये छत्तीसगडमधील जास्त प्रवासी होते. शैलजा अनिल कापसे आणि रामप्यारी आचार्य या जागीच ठार झाल्या तर अंकित मोगलगाय, पत्नी छाया मोगलगाय, (छिंदवाडा) कृष्णा घोडमारे, (सौंसर) लता घोडमारे, राम केवल भारद्वाज (सावनेर), फिरोज जब्बार कुरेशी हे प्रवासी जखमी झाले. जखमींना तात्काळ मेयो रुग्णालयात हलविण्यात आले. ठार झालेल्या दोन महिलांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात हलविण्यात आले.
शैलजा अनिल कापसे या खरबी रोडच्या रहिवासी असून त्या जिल्हा परिषद सावनेरमध्ये अंगनवाडी पर्यवेक्षिका आहेत. आज त्या सावनेरला जाण्यासाठी निघाल्या असता काळाने त्यांच्यावर झडप घातली. रामप्यारी आचार्य पंचशील नगरात राहत असून त्या छिंदवाडय़ाला नातेवाईकांकडे जात होत्या. बसचालक परशुराम किरकोळ जखमी झाला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.