18 September 2020

News Flash

पीएमपीचे खासगीकरण सुरू पीएमपीचे खासगीकरण सुरू

पीएमपीच्या खासगीकरणाचा पहिला फटका अपेक्षेप्रमाणे कामगारांना बसला असून खासगी वाहतूकदारासाठी पायघडय़ा आणि पीएमपीचे कामगार घरी असा प्रकार सुरू झाला आहे. खासगी वाहतूकदाराच्या गाडय़ा चालाव्यात यासाठी

| December 15, 2012 03:03 am

पीएमपीच्या खासगीकरणाचा पहिला फटका अपेक्षेप्रमाणे कामगारांना बसला असून खासगी वाहतूकदारासाठी पायघडय़ा आणि पीएमपीचे कामगार घरी असा प्रकार सुरू झाला आहे. खासगी वाहतूकदाराच्या गाडय़ा चालाव्यात यासाठी एकीकडे त्या गाडय़ांवर पीएमपीचे चालक पाठवले जात आहेत, तर दुसरीकडे पीएमपीच्या चालकांना काम नाही असे सांगून घरी पाठवले जात आहे.
पीएमपीने कोथरूड, संत तुकारामनगर आणि भक्ती-शक्ती या तीन आगारातील सीएनजीवर चालणाऱ्या प्रत्येकी पंचवीस नव्या गाडय़ा खासगीकरणाच्या माध्यमातून चालविण्यास दिल्या आहेत. या गाडय़ा प्रसन्न पर्पल मोबिलीटी सोल्युशन प्रा. लि. या कंपनीकडे वर्ग करण्यात आल्या असून या गाडय़ांवर वाहक (कंडक्टर) पीएमपीचा असेल, तर चालक (ड्रायव्हर) कंपनीचा असेल, असा करार आहे. तसेच गाडय़ांची देखभाल-दुरुस्ती देखील कंपनीने करायची आहे. खासगीकरणाच्या या प्रक्रियेला गुरुवारी पहाटेपासून सुरुवात झाली आणि पहिला फटका पीएमपीच्या पन्नासहून अधिक चालकांना बसला. खासगी वाहतूक कंपनीकडे पुरेसे चालक नसल्यामुळे पीएमपीने स्वत:चे चालक वाहूतक कंपनीला पुरवले आणि पीएमपीने या तीन आगारांमधून स्वत:च्या अनेक गाडय़ा मार्गावर पाठवल्या नाहीत. या गाडय़ा मार्गावर न गेल्यामुळे तीन आगारांमधील शंभरहून अधिक चालकांना गेले दोन दिवस काम मिळालेले नाही.
खासगीकरण सुरू झाल्याची ही वार्ता कामगारांना शुक्रवारी समजली तसेच चालकांना काम मिळत नसल्याचेही स्पष्ट झाल्यानंतर कामगारांनी या खासगीकरणाचा तीव्र निषेध सुरू केला. ‘भाडेतत्त्वावर गाडय़ा दिल्यानंतर पीएमपी सेवक वर्गावर कोणत्याही प्रकारचा प्रशासकीय वा आर्थिक प्रकारचा अन्याय होणार नाही. किंवा संबंधित सेवकांच्या सेवेस कामगार कायद्यानुसार कोणतीही बाधा येणार नाही, असे लेखी पत्र प्रशासनाने आम्हाला दिले आहे. प्रत्यक्षात खासगी कंपनीकडे गाडय़ा गेल्यानंतर कामगारांना काम नाही आणि खासगी कंपनीच्या गाडय़ा चालाव्यात यासाठीच सर्व प्रयत्न सुरू असल्याचे आम्हाला दिसत आहे,’ असे पीएमटी कामगार संघ (इंटक)चे सरचिटणीस ए. एन. अनपूर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
वास्तविक, भाडेतत्त्वावरील गाडय़ांवर करारानुसार ठेकेदाराचा चालक असणे आवश्यक असताना पीएमपी प्रशासनाने कंपनीला चालक पुरवले. त्यामुळे पहिल्याच दिवसापासून कराराचा भंग सुरू झाला आहे, असेही संघटनेचे म्हणणे आहे. पीएमपीच्या रोजंदारीवरील कामगारांचे जे आर्थिक नुकसान होत आहे त्याची भरपाई प्रशासनाने करावी, अशीही मागणी संघटनेने केली आहे. कामगारांवर कोणताही अन्याय होता कामा नये आणि प्रत्येक कामगाराला काम मिळेल याची जबाबदारी प्रशासनावर असून मुळातच या खासगीकरणाला आमचा विरोध आहे आणि हाच प्रकार पुढे सुरू राहिल्यास आंदोलन करावे लागेल, असाही इशारा अनपूर यांनी दिला आहे. तसे पत्र पीएमपी प्रशासनाला देण्यात आले आहे.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2012 3:03 am

Web Title: privatisation of pmp started
टॅग Pmp,Transport
Next Stories
1 पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची मंगळवारपासून महाअंतिम फेरी
2 अन् ‘त्या’ दोघींना पुन्हा आई-बाबा सापडले!
3 एमआयडीसीसाठी वडगाव गुप्तात जागा पाहणी
Just Now!
X