शहरातील पाच ट्रॅफिक सिग्नलचे खासगीकरण करण्यात आले असून या कामाचा ठेका मायक्रोनेट ट्रॅफिक अँड कंट्रोल सिस्टिम या कंपनीला देण्यात आला आहे. सिग्नल असलेल्या चौकात जाहिरातीसाठी पोल उभारण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. माळकर तिकटी, गंगावेश चौक, शहाजी लॉ कॉलेज चौक, स्वयंभू गणेश चौक, मिलन हॉटेल चौक या पाच ठिकाणी सिग्नल उभारले जाणार आहेत.    
शहरामध्ये एकूण ३६ ट्रॅफिक सिग्नल आहेत. त्यापैकी २० सिग्नल रस्ते विकास महामंडळातर्फे करण्यात आलेल्या रस्ते विकास प्रकल्पांतर्गत आयआरबी कंपनीने केलेल्या रस्त्यावर आहेत. इतर १६ सिग्नल अन्य चौकात आहेत. त्यापैकी वरील पाच ठिकाणच्या सिग्नलचे खाजगीकरण केले जाणार आहे. या कामांतर्गत सिग्नल उभारणे, प्रति सिग्नल ५५ पोल उभारणे, त्यावर ठरावीक आकाराचे फलक लावणे या कामाचा समावेश आहे. कंपनीला प्रत्येक वर्षी १५ हजार रुपये याप्रमाणे १५ वर्षे पैसे भरावे लागणार आहेत. सिग्नल उभारलेल्या चौकातील पोलवरील जाहिरातीचे उत्पन्न कंपनीला मिळणार आहे.