पालिकेची बिघडलेली आर्थिक स्थिती पाहता बेलापूर, नेरुळ, ऐरोली येथे बांधण्यात आलेल्या तीन प्रथम संदर्भ रुग्णालयांचे खासगीकरण करण्याचा घाट पालिका प्रशासनाने आखला असल्याचे समजते. यापूर्वी वाशी येथील पालिका मध्यवर्ती रुग्णालयातील दोन लाख चौरस फूट क्षेत्रफळ प्रथम हिरानंदानी हेल्थ केअर रुग्णालयाला आणि त्यानंतर त्या रुग्णालयाच्या माध्यमातून फोर्टिजला भाडेतत्त्वावर पालिकेने दिले आहे. रुग्णालयीन कर्मचारी, डॉक्टर, वैद्यकीय सुविधा, विद्युतजोडण्या, गॅसपुरवठा व इतर अतिरिक्त खर्च या सर्वापासून सुटका करून घेण्यासाठी नव्याने बांधण्यात आलेली ही रुग्णालये खासगी वैद्यकीय संस्थांना देण्याचा प्रशासन विचार करीत आहे. त्याला सर्व स्तरांतून विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवी मुंबई पालिकेने प्रारंभीच्या काळात आरोग्याची घडी बसविण्याच्या दृष्टीने वैद्यकीय सेवा उभारली आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कर्ज घेण्यात आले होते. एके काळी मलेरियाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरातील वैद्यकीय सेवा वाखाणण्याजोगी होती. त्यामुळे आजूबाजूच्या उपनगरातील अनेक नागरिक पालिकेच्या या सेवेचा लाभ उठवीत आहेत. बेलापूर, नेरुळ, ऐरोली येथील माता बाल संगोपन केंद्राच्या इमारती जर्जर झाल्याने त्या जागी नवीन इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे अवास्तव खर्च करून त्यातून मलिदा ओरपण्याची सवय लागलेल्या स्थापत्य विभागाने या तीन रुग्णालयांवर अंदाजित खर्चापेक्षा ९० कोटी रुपये जास्त खर्च केले आहेत. बेलापूर येथील इमारतीचे प्रारंभी बांधकाम आठ कोटी २६ लाख होते. ते नंतर २३ कोटींपर्यंत नेण्यात आले आहे.
या ठिकाणी ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. नेरुळ व ऐरोलीत १०० खाटांची सोय असून या रुग्णालयावर ८८ कोटी रुपये जास्त खर्च करण्यात आले आहेत.
ऐरोलीच्या रुग्णालयाची प्रथम बांधकाम किंमत ३८ कोटी होती, ती आता ७४ कोटी रुपये झाली आहे, तर नेरुळच्या रुग्णालयाची किंमत ३७ कोटींवरून चक्क ७२ कोटी रुपये नेण्यात आली आहे. अशा प्रकारे आलिशान बांधण्यात आलेल्या या रुग्णालयात पालिका अत्यवस्थ रुग्णांसाठी लागणारी व्हेंटिलेंटर गॅस पाइपलाइन टाकण्यास विसरली आहे. त्याचे निविदा सोपस्कार सुरू असून या रुग्णालयांसाठी २०० पर्यंत कर्मचारी भरण्याची प्रक्रियादेखील पूर्ण करण्यात आली आहे, मात्र पालिकेची आर्थिक स्थिती पाहता नवीन प्रकल्प किंवा अतिरिक्त खर्च करणे पालिकेला यापुढे कठीण जाणार आहे. त्यामुळे ही तिन्ही रुग्णालये खासगी वैद्यकीय संस्थांना चालविण्यास देण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी वीस वर्षांच्या लेखाजोख्यावर चर्चा करताना वाशी येथील फोर्टिज रुग्णालयावर दहा टक्क्यांतून चांगली सेवा मिळत असल्याने कौतुकाचा वर्षांव केला आहे. त्याच वेळी ही रुग्णालये खासगी संस्थांना आंदण देण्याचा घाट रचला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नवी मुंबईची भौगोलिक रचना एका सरळ रेषेत असल्याने दिघा येथील रुग्णाला वाशीला जाण्यासाठीही वाहतूक कोंडी आणि इतर कारणास्तव अर्धा तासापेक्षा जास्त काळ लागतो. या वेळेमुळे यापूर्वी काही रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे रुग्णाच्या सोयीसाठी पाच किलोमीटरच्या सिडको नोडमध्ये रुग्णालये उभारली गेली आहेत. त्यात एका माजी आयुक्ताने हे आरोग्य मिशनच्या नावाखाली जुन्या इमारती पाडून नवीन बांधण्याच्या कामात चांगलेच हात धुऊन घेतले. त्यामुळे या आयुक्ताला राजकीय हौस भागविण्याची संधी अशा अनेक बडय़ा कामांमुळे प्राप्त होऊ शकली. अंदाजित रकमेपेक्षा तिप्पट खर्च करून जनतेसाठी बांधण्यात आलेली ही रुग्णालये आता खर्चाचे कारण देऊन खासगी संस्थांना देण्याचा घाट रचला जात आहे.